22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीय८ आसनी वाहनांत ६ एअरबॅगची सक्ती!

८ आसनी वाहनांत ६ एअरबॅगची सक्ती!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा वाहन अपघातात मृत्यू झाल्याने वाहनातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार ऑक्टोबरपासून ऑटो कंपन्यांसाठी ८ आसनी वाहनांमध्ये किमान ६ एअरबॅग असणे बंधनकारक करण्याचा विचार करत आहे. याबाबत माहिती देताना केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनांमधील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले जात आहे, असे म्हटले.

या वर्षाच्या सुरुवातीला, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले होते की, वाहन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. जेणेकरून वाहनांची सुरक्षितता वाढेल. ८ आसनी वाहनांसाठी किमान ६ एअरबॅग अनिवार्य करण्याच्या प्रश्नावर गडकरी म्हणाले की, प्रयत्न तर तोच आहे. कारण एअरबॅगच प्रवाशांचा जीव वाचवू शकतात. जोपर्यंत एअरबॅगचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार नाही, तोपर्यंत अपघातात प्रवाशांचा जीव वाचविता येणार नाही. विशेष म्हणजे ८ आसनी गाड्यांमध्ये ६ एअरबॅगची सक्ती करून अधिकाधिक प्रवाशांचा जीव वाचवायचा आहे, असे गडकरी म्हणाले. यासोबतच अपघाताचे प्रमाण कसे रोखता येईल, यासाठीही रस्ते वाहतूक मंत्रालय प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले.

आघाडीचे उद्योजक सायरस मिस्त्री यांचा नुकताच अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर देशभरात हळहळ व्यक्त करण्यात आली. तसेच रस्ते सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली. विशेषत: भारतीय रस्त्यांवरील सुरक्षेबाबत, मागच्या सीटवर बसणा-या प्रवाशांच्या सुरक्षिततेवर अनेकदा दुर्लक्ष केल्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले. असे मानले जाते की मिस्त्री यांच्या मृत्यूमागील मुख्य कारण त्यांनी मर्सिडीज जीएलसी कारच्या मागील सीटवर सीट बेल्ट वापरला नाही. त्यामुळे सीटबेल्टबाबतही जागरुकता वाढविण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.

अलार्म स्टॉपरवर बंदी घातली जाऊ शकते
या घटनेने सरकारला सीट बेल्टच्या नियमांचा पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे. आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय लवकरच सीट बेल्ट वॉर्निंग अलार्म बंद करण्यासाठी वापरल्या जाणा-या सिस्टमवर बंदी घालू शकते. अशा अनेक क्लिप बाजारात विकल्या जात आहेत, ज्याचा वापर सीट बेल्टचा अलार्म बंद करण्यासाठी केला जातो. सरकार त्याच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याच्या तयारीत आहे.

चार मुद्यांवर लक्ष केंद्रीत
रस्ते वाहतूक मंत्रालय याबाबत ४ महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते. प्रथम मंत्रालय सीट बेल्ट बीप अलार्म स्टॉपर्सवर बंदी घालू शकते. कारमध्ये ६ एअरबॅग्ज अनिवार्य, कार उत्पादकांसाठी मधल्या आणि मागील सीटसाठी थ्री-पॉईंट सीट बेल्ट अनिवार्य करू शकते आणि सीट बेल्टच्या महत्त्वाबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी मोहीम राबवू शकते.

नव्या रस्त्यांच्या डिझाईनचे काटेकोरपणे पुनरावलोकन
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय नवीन रस्त्यांच्या डिझाइन प्रस्तावांचे काटेकोरपणे पुनरावलोकन करू शकते. या नियमांचे पालन करण्यात अयशस्वी ठरणा-यांना कठोर दंड ठोठावू शकते. याबाबत कठोर पावले उचलल्यास अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते, तर सीट बेल्टच्या नियमांचे पालन झाल्यास मोठी जीवित हानीही टळू शकते, असे गडकरी यांचे म्हणणे आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या