नवी दिल्ली : रेल्वेला ‘सुपर वेग’ मिळण्याच्या दृष्टीने ठोस प्रयत्न सुरू झाले आहेत. २०० किलोमीटर प्रती तास या वेगाने धावणा-या १०० अत्याधुनिक गाड्या रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
भारतीय रेल्वेच्या संशोधन, अभिकल्प व मानक संघटनेने याबाबतच्या वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. तशा रेल्वेगाड्या सुरू झाल्यावर दिल्ली-मुंबई हा प्रवास फक्त ७ तासांत, दिल्ली-पाटणा ७ तासांत तर दिल्ली-लखनौ अंतराचा प्रवास अक्षरश: अडीच तासांत पूर्ण होणे शक्य होणार आहे.
‘आरडीएसओ’ चे महासंचालक संजीव भुटानी यांनी याबाबतच्या प्रकल्पाची माहिती दिली. सध्या शताब्दी व राजधानी रेल्वेगाड्या सर्वसाधारण ताशी १३० किमी वेगाने धावतात.
हा वेग २०० पर्यंत नेण्यासाठी सिग्नलिंग, रेल्वे ट्रॅक यासह अन्य तांत्रिक बाबी व मनुष्यबळाचेही आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी रेल्वेने यापूर्वीच काम सुरू केले आहे. ही सुविधा खरोखरच निर्धारित मुदतीत साकार झाली, तर भारतीय रेल्वे विमान कंपन्यांना टक्कर देण्याच्या परिस्थितीत येईल. याबाबतचे दिशानिर्देश यापूर्वीच जारी करण्यात आले आहेत.
आपत्कालीन स्थितीत २०० किमी प्रती तास इतक्या वेगाने धावणा-या गाड्यांची टक्कर होऊन भलताच अनावस्था प्रसंग उद्भवू नये यादृष्टीने इंजिन प्रणालीत एक अत्याधुनिक टक्कर विरोधी यंत्रणाही कार्यरत करण्यात येणार आहे. याच वर्षी सध्याच्या रेल्वेगाड्यात अशी प्रणाली चाचणी तत्वावर बसविण्यात येणार आहे. मार्च २०२२ मध्ये याबाबतचे प्राथमिक परीक्षण पूर्ण करण्यात आले.