नवी दिल्ली : कोरोनाच्या कालावधीत ताप कमी करण्यासाठी सर्वांच्या तोडांत डोलो-६५० या गोळ्यांचे नाव होते. आता हा ब्रँड बनवणा-या कंपनीबाबत मोठा खुलासा झाला आहे. काही दिवसांपूर्वीच डोलो-६५० निर्मात्या कंपनीवर धाड पडली होती.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने डोलो-६५० औषध निर्मात्यावर डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिकांना डोलो-६५० ची विक्री वाढविण्याच्या मोबदल्यात सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या मोफत भेटवस्तू दिल्याचा आरोप केला आहे. ६ जुलै रोजी नऊ राज्यांमधील बेंगळुरूस्थित मायक्रो लॅब्स लिमिटेडच्या ३६ ठिकाणी छापे टाकल्यानंतर आयकर विभागाने हा दावा केला आहे.
सीबीडीटीने सांगितले की, औषध निर्मात्यावर कारवाई केल्यानंतर विभागाने १.२० कोटी रुपयांची रोख रक्कम आणि १.४० कोटी रुपयांचे सोने आणि हि-यांचे दागिने जप्त केले आहेत. सीबीडीटीने म्हटले की, शोध मोहिमेदरम्यान, कागदपत्रे आणि डिजिटल डेटाच्या स्वरूपात महत्त्वपूर्ण पुरावे सापडले असून ते जप्त करण्यात आले आहेत.