गांधीनगर: रशिया-युक्रेन युद्धामुळे गुजरातचा हिरे उद्योग संकट सापडला आहे. गुजरातमधील लाखो मजुरांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. सौराष्ट्रामधील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात हि-यावर प्रोसेसिंग आणि पॉलिशिंग करण्याचे काम चालते. या युनिटमध्ये रशियातून लहान आकाराचे हिरे येतात. मात्र युद्धामुळे हि-यांची आयात कमी झाली आहे. त्यामुळे आता व्यापा-यांना आफ्रिका खंडासह अन्य देशांमधून कच्चा माल मागवावा लागत आहे. त्याचा परिणाम नफ्यावर होत आहे. गुजरातमध्ये हिरे उद्योगात जवळपास १५ लाख लोक काम करतात.
हि-याच्या अनेक युनिट्सनी त्यांच्याकडे काम करणा-या मजुरांच्या कामाचे तास कमी केले आहेत, अशी माहिती रत्न आणि दागिने निर्यात परिषदेचे अध्यक्ष दिनेश नवादिया यांनी दिली. मजुरांच्या कामाचे तास कमी केल्याने त्यांना मिळणारी मजुरी कमी झाली आहे. त्यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठ्या आकाराच्या हि-यावर मुख्यत: सूरत शहरात प्रोसेसिंग केले जाते. भारत अमेरिकेला जवळपास ७० टक्के पॉलिश केलेले हिरे निर्यात करतो. मात्र रशिया-युक्रेन युद्धामुळे अमेरिकेने रशियन कंपन्यांवर निर्बंध लागले आहेत.
आम्ही रशियन सामान घेणार नसल्याची माहिती अमेरिकेतील मोठ्या कंपन्यांनी ई-मेल करून सांगितल्याचे नवादिया म्हणाले. अमेरिकेने घेतलेल्या भूमिकेचा फटका सौराष्ट्र, भावनगर, राजकोट, अमरेली आणि जुनागढसह राज्याच्या उत्तरेकडील भागांतील मजुरांना बसला आहे. हि-यांच्या एकूण आयातीपैकी २७ टक्के आयात रशियाकडून करण्यात येते. युद्धामुळे गुजरातमधील कारखान्यांना कच्चा माल मिळत नाही. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर हि-याला पैलू पाडले जातात. हिरे उद्योगात काम करणारे जवळपास ५० टक्के मजूर लहान आकाराच्या हि-यांवर काम करतात. हे मजूर पटली नावाने ओळखले जातात.