बंगळुरु : कर्नाटकातील यदियुराप्पा मंत्रिमंडळचा नुकताच विस्तार करण्यात आला होता. मात्र त्यामुळे भाजपमधील असंतुष्ट आमदारांची नाराजी वाढली आहे. विस्तारात संधी न मिळाल्याने १५ आमदार यदियुराप्पांविरोधात बंडाच्या पावित्र्यात असल्याचे वृत्त आहे. यदियुराप्पांविरोधात हे आमदार भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. यदियुराप्पा यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री बी.एस. यदियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा १३ जानेवारी रोजी विस्तार करण्यात आला. यावेळी ७ नव्या चेह-यांना संधी देण्यात आली. मात्र, ज्यांना संधी मिळाली नाही,असे १५ आमदार नाराज झाल्याचे समजते आहे. विस्तारावर भाजपाच्याच आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. जे लोक सातत्याने सत्तेत आहेत, त्यांनाच संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना मंत्री करण्यासाठी ज्या गोष्टी विचारात घेतल्या गेल्या, त्या चुकीच्या आहेत,अशी या आमदारांची भावना असल्याचे समजते आहे. नाराज आमदार एकमेकांच्या संपर्कात असून, भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडे तक्रार करण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याचेही वृत्त आहे.
जुन्या मंत्र्यांना बाहेर काढण्याची मागणी
राज्य सरकारने वरिष्ठ मंत्र्यांना आणि विधान परिषद सदस्यांना मंत्रिमंडळातून बाहेर करावे आणि नव्या चेह-यांना संधी द्यावी. हे नवीन चेहरे पुढील दशकभर पक्षाची बांधणी करण्याचे काम करू शकतात,असे या नाराज आमदारांचे मत आहे. नाराज भाजपा आमदार दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. आमदारांकडून भेटीसाठी वेळ मागण्यात आल्याचेही वृत्त असून, राष्ट्रीय नेतृत्व या आमदारांच्या मागण्यांची दखल घेणार का?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एलओसीवर ३ दहशतवाद्यांचा खात्मा