श्रीनगर : आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरू असून, भारतामध्ये घुसखोरीचे प्रयत्नही सुरुच आहेत. अशातच बुधवारी सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाकिस्तानचा आणखी एक डाव उधळला आहे. भारत-पाक सीमेवरील कठुआ येथील हिरानगर सेक्टरमध्ये बीएसएफच्या जवानांनी एक १५० मीटर लांबीचा बोगदा शोधून काढला आहे. परिणामी भारतात अतिरेकी घुसवण्याचे पाकिस्तानचे नापाक इरादे पुन्हा एकदा उधळून लावला आहे.
बीएसएफच्या अधिका-यांनी याबाबत माहिती दिली. जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ एक बोगदा आढळून आला आहे. हा बोगदा जवळपास १५० मीटर लांब असून, यामधून काही सिमेंटची पोती देखील हस्तगत करण्यात आली आहे. हे सिमेंट पाकिस्तानमधील कराची येथील असल्याचे दिसून आले आहे, असे लष्कराकडून सांगण्यात आले. हा बोगदा पाकिस्तानच्या पोस्टच्या अगदी समोरूनच खोदला गेला आहे, असेही सांगण्यात आले.
बीएसएफकडून वारंवार कारवाई
पाकिस्तानकडून सीमेपलीकडून होणा-या घुसखोरीच्या कारवाया बीएसएफने अगोदर देखील हाणून पाडल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील बेंगालड परिसरात २५ फूट खोल व १५० मीटर लांबीचा बोगदा शोधून आला होता. या भूयारी मार्गातही शक्करगढ, कराची लिहिलेल्या काही वाळूच्या पिशव्या सापडल्या होत्या. त्या बोगद्यांपासून पाकिस्तानी लष्कराची चौकी ४०० मीटर अंतरावर असल्याचेही लष्कराने सांगितले होते.
पाकमध्ये दहशतवाद्यांना मिळते फाइव्ह स्टार सेवा – यूनोत भारताने केली पाकची पोलखोल