नवी दिल्ली : देशात कोविड सारख्या पसरणा-या एच३एन२ इन्फ्लूएंझामुळे झालेल्या मृत्यूची बातमी पहिल्यांदाच समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयातील सूत्रांचा हवाला देत मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, हरियाणा आणि कर्नाटकमध्ये इन्फ्लूएंझा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत एच३एन२ चे ९० रुग्ण आढळून आले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून राजधानी दिल्लीसह भारतातील अनेक भागात इन्फ्लूएंझाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोना महामारीनंतर लोकांमध्ये फ्लूचे रुग्ण वाढण्याची भीती आहे, कारण कोरोना सारखीच लक्षणे त्रस्त रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांत दिल्ली आणि आसपासच्या भागातून असे अनेक रुग्ण रुग्णालयात पोहोचले आहेत, ज्यांना गेल्या १०-१२ दिवसांपासून तीव्र तापासह खोकला येत आहे.
ज्येष्ठांनी अधिक काळजी घेणे आवश्यक
एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशात पसरणा-या एच३एन२ इन्फ्लूएंझाबाबत लोकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की हा कोरोनासारखा पसरतो. हे टाळण्यासाठी मास्क घाला, सामाजिक अंतर पाळा आणि हात वारंवार धुवा. वृद्ध आणि आधीच कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना यामुळे जास्त अडचणी येण्याची शक्यता आहे.
पुन्हा एकदा भीतीचे वातावरण
देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या पाहता पुन्हा एकदा भीती वाटायला लागली आहे. ६७ दिवसांनंतर, कोरोनाचे सक्रिय रुग्ण ३ हजारांहून अधिक झाले आहेत. कोविड प्रकरणांमध्ये अचानक वाढ होण्याबरोबरच एच३एन२ विषाणूच्या प्रकरणांमध्येही वाढ झाली आहे, जी चिंताजनक आहे.