23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeराष्ट्रीयदेशातील २४ स्मारक स्थळे बेपत्ता!

देशातील २४ स्मारक स्थळे बेपत्ता!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, आसाम व हरियाणातील २४ स्मारक-स्थळे बेपत्ता झाल्याची माहिती सरकारने संसदेत दिली. स्वातंत्र्यापासून देशातील १९ राज्य व केंद्रशासित प्रदेशांतील स्मारके व स्थळांच्या चोरीचे २१० गुन्हे दाखल आहेत. यात चोरी झालेल्या ४८६ वस्तूंचा समावेश आहे. यातील ९१ वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. उर्वरित वस्तूंचा शोध सुरू आहे, असे केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी लोकसभेत स्पष्ट केले.

भारतातील स्मारक, ऐतिहासिक स्थळे हा देशाचा फार मोठा वारसा आहे. यातून इतिहासाच्या पाऊलखुणांचे दर्शन होते. त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा जपण्याचे काम पुरातत्व विभाग करतो. मात्र, स्मारक आणि ऐतिहासिक स्थळे चोरीचे प्रकारही देशात घडल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे देशातील जवळपास २४ स्मारक स्थळे गायब असल्याची माहिती लोकसभेत देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

यासंबंधी लोकसभेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रेड्डी म्हणाले की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने (एएसआय) मागील ८ वर्षांत देशभरातील ८,४७८ गावांचा सर्व्हे केला. त्यातील २९१४ गावांत पुरातत्व अवशेष आढळले. एएसआयतर्फे पुरातन अवशेषांचा शोध घेण्यासाठी गावोगावचे सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, स्मारके बेपत्ता झाल्याने या प्रकरणी वेगवेगळ््या ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत, असेही सांगण्यात आले.

एएसआयकडून देशातील ३,६९३ वारसास्थळांचे जतन
देशातील पुरातन, ऐतिहासिक वारसा जपण्याचे आणि त्याचे जतन करण्याचे काम भारतीय पुरातत्व विभाग (एएसआय) करतो. एएसआय देशातील एकूण ३६९३ वारसास्थळांचे जतन करते. यातील ७४३ स्थळे एकट्या उत्तर प्रदेशात आहेत. रेड्डींनी २०१४-१५ ते २०२१-२२ पर्यंत एएसएने केलेल्या राज्यवार सर्व्हेची माहिती दिली. यातील एकूण ८४७८ गावांपैकी १४५९ गावे पंजाब व ९३३ गावे कर्नाटकातील आहेत. या दोन्ही राज्यांपैकी १३० व ८०६ गावांत पुरातत्व अवशेष आढळले आहेत.

मागील ५ वर्षांत ९०५ गावांत पुरातत्व अवशेष आढळले
मागील ५ वर्षांत म्हणजे २०१७ ते २०२१ दरम्यान देशातील ३१५२ गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील ९०५ गावांत पुरातत्व अवशेष असल्याची माहिती मिळाली. एएसआय उत्तर प्रदेशातील १४४ मंदिरांसह ७४३ स्मारकांची देखरेख करते. तसेच १२२४ स्मारकांत कल्चरल नोटीस असल्याचेही रेड्डी यांनी यावेळी सांगितले. देशाच्या १४३ स्मारकांत प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या