हैदराबाद : आंध्र प्रदेशातील चित्तूरजवळ रविवार दि. २४ जुलै रोजी पहाटे झालेल्या एका रस्ते अपघातात बंगळुरूचे तीन पोलिस ठार झाले आहेत तर चार जण जखमी आहेत. हे सर्व पोलिस आंध्र प्रदेशात ड्रग्ज तस्कराच्या शोधात गेले होते. कर्नाटकचे गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे.
गृहमंत्री ज्ञानेंद्र यांनी सांगितले की हे पोलिस बंगळुरूमधील शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. सर्व पोलिस चित्तूरमध्ये ड्रग तस्कराच्या शोधात जात असताना त्यांची कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. यामुळे ३ पोलिसांचा मृत्यू झाला, तर ४ पोलिस गंभीर जखमी आहेत. कर्नाटकचे पोलिस पथक अपघातस्थळी पोहोचले असून मृतदेह आणि जखमींना बंगळुरूला आणण्याची व्यवस्था करत आहेत. मात्र, पोलिसांच्या वाहनाचा अपघात कशामुळे झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. यामागे चालकाची काही चूक होतीकिंवा वाहनाचा वेग जास्त असल्याने ते दुभाजकावर आदळले का? याबाबतही माहिती मिळू शकली नाही.