नवी दिल्ली : कोरोना विषाणूने जगभरात धुमाकुळ घातला आहे. आतापर्यंत अनेकांना या आजाराने ग्रासलं आहे. तसेच बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिवसेंदिवस वाढणारी रूग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे. अशातच कोरोनावर मात करणारी लस कधी येणार यावर सर्वांचेच लक्ष लागले आहे. जगातील बहुतांश देश कोरोनालसीवर संशोधन करत असून, लस कधी येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. दिलासादायक बाब म्हणजे ऑक्सफोर्ड विद्यापीठाने कोरोनावर मात करणारी लस तयार केली आहे.
भारतातसुद्धा ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या कोरोना लसीची निर्मिती होणार
या लसीची मानवी चाचणी करण्यात आली असून, त्याचे परिणामही चांगले आले आहे. त्यामुळे भारतातसुद्धा ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या कोरोना लसीची निर्मिती होणार आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोरोना लस ग्रुपचे डायरेक्टर एंड्रयू जे पोलार्ड आणि पुण्यातील सीरम इंस्टीट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी एका वृत्तवाहिनाला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.
संपूर्ण जगाला पुरविणे हे एक मोठे आव्हान सध्या जगासमोर आहे
एंड्रयू पोलार्ड यांनी सांगितले की, या लसीची मानवी चाचणी झाली असून, आता या लसीमुळे कोरोना विषाणूचा बचाव होऊ शकतो याचा पुरावा आम्हाला हवा आहे. तसेच ह्या लसीची चाचणी आम्हाला वेगवेगळ्या रूग्णांवर करायची आहे. कोरोनाच्या काळात लस बनविणे आणि संपूर्ण जगाला पुरविणे हे एक मोठे आव्हान सध्या जगासमोर आहे.पूनावाला म्हणाले की, आम्ही ही लस भारतात मोठ्या प्रमाणात तयार करणार आहोत आणि या आठवड्यातच आम्ही या लसीसाठी सरकारची परवानगी घेणार आहोत. पूनावाला म्हणाले की डिसेंबरपर्यंत आम्ही ऑक्सफोर्डच्या कोविशिल्ट या लसीचे 30 कोटी डोस तयार करणार आहोत.
सुरुवातीला यावर कोणताही नफा घेतला जाणार नाही – पूनावाला
या लसीच्या किंमतीबद्दल बोलताना ते म्हणाले की, कोरोना सारख्या महामारीचा संपूर्ण जग सामना करीत असल्याने आम्ही त्याची किंमत किमान ठेवणार आहे. सुरुवातीला यावर कोणताही नफा घेतला जाणार नाही. ते म्हणाले की भारतात त्याची किंमत सुमारे 1000 रुपये किंवा त्यापेक्षाही कमी असू शकते. संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लसींची आवश्यकता लागणार आहे. अशा परिस्थितीत त्याचे उत्पादन व वितरण यासाठी आम्हाला शासकीय यंत्रणेची आवश्यकता असेल.
Read More दुधाचा प्रतिकात्मक अभिषेक घालून राजू शेट्टी यांनी केली आंदोलनास सुरूवात