28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeराष्ट्रीयजनऔषधीमुळे वर्षात ३६०० कोटींची बचत

जनऔषधीमुळे वर्षात ३६०० कोटींची बचत

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात गरिबांसाठी जनऔषधी केंद्रांची सुविधा उपलब्ध करून दिली. देशभरात ही केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांमधून ४० ते ९० टक्क्यांपर्यंत औषधी स्वस्त मिळते. त्यामुळे ४ मार्च २०२१ पर्यंतच्या चालू आर्थिक वर्षात ३ हजार ६०० कोटी रुपयांची बचत झाली आहे. जनऔषधी केंद्रांसंदर्भात माहिती देण्यासाठी १ ते ७ मार्चदरम्यान जनजागृती आठवडा पाळण्यात आला. त्यामुळे जनऔषधी केंद्रातून सेवा आणि रोजगारही उपलब्ध झाल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान, भविष्यात देशआत आणखी १० हजारांवर जनऔषधी केंद्रे सुरू करण्याची केंद्राची योजना आहे.

जनऔषधी दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिलॉंग येथे ७५०० वे जनऔषधी केंद्र देशाला समर्पित केले, त्यावेळी त्यांनी संवादही साधला. भारत जगातील फार्मसी आहे, हे सिद्ध झाले आहे. जगभरात भारतातील जेनरिक औषधाला मागणी आहे. मात्र, आतापर्यंत देशात याचा फारसा प्रसार झाला नाही. याचा विचार करून केंद्र सरकारने स्वस्तातील जेनेरिक औषधी सहज उपलब्ध व्हावी आणि गरिबांना मदत व्हावी, या उद्देशाने यावर जोर देण्यात आला आहे, असे मोदी यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे कोरोना काळात संपूर्ण जगाने भारतीय औषधीच्या शक्तीचा अनुभव घेतला आहे. आता आपल्याजवळ देशात आणि जगासाठी मेड इन इंडिया कोरोना लस तयार आहे. कोरोना लसीकरण शासकीय रुग्णालयात मोफत आणि खाजगी रुग्णालयात २५० रुपयांत दिली जात आहे. एवढेच नव्हे, तर जगभरात मागणीनुसार लसीचा पुरवठा केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी देशभर पीएम जनऔषधी योजना सुरू आहे. ही योजना सेवा आणि रोजगाराचे एक माध्यम आहे. कारण यातून एक तर युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आणि देशातील माता आणि भगिनींना अवघ्या अडीच रुपयांत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले जात आहे. यातून महिलांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येण्यास मदत होणार आहे. या केंद्रांमधून आतापर्यंत ११ कोटींवर सॅनिटरी नॅपकिनची विक्री झाली आहे. या योजनेतून पहाडी क्षेत्र, उत्तर-पूर्व भाग, आदिवासी विभागासह देशभरात सामान्यांना सहज आणि स्वस्तात औषधी मिळण्याची सोय झाली आहे.

७५०० व्या केंद्राचे लोकार्पण
जनऔषधी दिनानिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिलॉंगमध्ये ७५०० व्या जनऔषधी केंद्राचे लोकार्पण केले. याचाच अर्थ देशभरासह उत्तर-पूर्व भागातदेखील याचा विस्तार झाला आहे. यामुळे सर्वत्र स्वस्तात औषधी मिळण्याची सोय झाली असून, देशात ७५०० जनऔषधी केंद्र कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आरोग्याचा विषय केवळ आजारातून मुक्तता नाही, तर सामाजिक , आर्थिक विकासाला गती देण्याचा भाग आहे, असे सांगण्यात आले.

गरिबांसाठी योजना
औषधी महाग आहे. त्यामुळे गरिबांसाठी ही प्रधानमंत्री जनऔषधी योजना सुरू केली असून, ती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. यातून पैशाची बचत होऊ लागली आहे. त्यामुळे जनतेने अशा दुकानांतून स्वस्तातील औषधी खरेदी करून आरोग्यमय जीवन जगावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

महिला चालवतात १ हजारांवर केंद्रे
देशात एक हजारांपेक्षा जास्त जनऔषधी केंद्रे महिला चालवतात. याचाच अर्थ ही योजना महिलांना आत्मनिर्भर करण्याचे कामही करीत आहे. जनऔषधी केंद्रांवर देशात ७५ आयुष औषधी उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेतला आहे. त्यामुळे भविष्यात रुग्णांना ही केंद्रे अधिक आधारभूत ठरतील, असे सांगण्यात आले.

आज राज्याचे बजेट; आर्थिक संकटात संतुलन राखण्याचे अर्थमंत्र्यांसमोर आव्हान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या