21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयप्रतिदिन ३७ कि.मी. हायवे निर्मितीचा विक्रम

प्रतिदिन ३७ कि.मी. हायवे निर्मितीचा विक्रम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात रस्ते विकासावर मोठ्या प्रमाणात भर दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सुरुवातीपासूनच मजबूत रस्ते तयार करण्यावर लक्ष केंद्रीत केले आणि राष्ट्रीय महामार्ग बनविण्यात नवनवा विक्रमही नोंदवला. त्यातच देशात प्रतिदिन ३७ कि.मी. हायवे तयार करून जगात एक नवा विक्रम नोंदविला असल्याचे गडकरी यांनी सांगितले. विशेष म्हणजे कोरोनाचे संक ट भेडसावत असतानाही तब्बल १३ हजार कि.मी. लांब महामार्ग बनवल्याचेही त्यांनी सांगितले.

देशात राष्ट्रीय महामार्ग बनविण्यावर सरकारने भर दिला आहे. हे काम करीत असताना आतापर्यंत नवनवे विक्रम प्रस्थापित केले. आता तर दररोज तब्बल ३७ कि.मी. रस्ता तयार करून नवा विक्रम प्रस्थापित केला असून, या वेगाने सध्या विविध ठिकाणी काम सुरू आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे संकट असतानाही त्याच वेगाने रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ते निर्मितीत जगात एक नवा विक्रम नोंदवला गेला आहे. यावरूनच रस्त्याचे काम देशात किती वेगाने सुरू आहे, याचा अंदाज येतो. सद्यस्थितीत देशात जे रस्त्यांचे प्रकल्प सुरू आहेत. याची तरतूद मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ५४ टक्क्यांनी वाढली आहे.

रस्ते विकासाच्या मुद्यावर बोलताना गडकरी म्हणाले की, ज्यावेळी केंद्रीय राज्यमार्ग मंत्रालयाचा पदभार स्वीकारला, त्यावेळी ३.८५ लाख कोटींचे तब्बल ४०६ प्रकल्प रखडले होते. त्यावेळी एकानंतर एक नवे पाऊल टाकत भारतीय बँकांचे ३ लाख कोटी रुपयांचे बुडित खाते वाचविले आणि रस्तेही चकाचक करण्याचा प्रयत्न केला. त्याला मोठ्या प्रमाणात यश आले. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्गाचे काम गतीने व्हावे, यासाठी तात्काळ निर्णय घेत गेलो. एवढेच नव्हे, तर ४० हजार कोटींचा खर्च येणारे प्रकल्पही रद्द केले. वेळच्या वेळी योग्य तो निर्णय घेत गेल्याने रस्ते बांधणीत मोठे यश मिळविता आले.

केंद्र सरकारने भारतमाला योजनेअंतर्गत ५.३५ लाख कोटींचा खर्च करून ३४ हजार ८०० कि.मी. राज्यमार्ग निर्माण केले. मागच्या पाच वर्षांत १७ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची सुरुवात करून रस्त्यांचे मजबूत काम सुरू केले. नवे हायवे बनवितानाच एका नव्या भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचे काम केले. त्यामुळे पुढील पाच वर्षांत आपण रस्त्याबाबत अमेरिका आणि युरोपला टक्कर देण्याईतके सक्षम होणार आहेत, असेही गडकरी म्हणाले.

७ वर्षांत महामार्गाच्या लांबीत ५० टक्के वाढ
महामार्गाचे काम वेगाने सुरू असल्याने गेल्या ७ वर्षांत राष्ट्रीय राज्यमार्गांची लांबी ५० टक्क्यांनी वाढली आहे. एप्रिल २०१४ मध्ये राष्ट्रीय राज्यमार्गांची लांबी ९१ हजार २८७ किलो मीटर होती, ती मार्च २०२० मध्ये १ लाख ३७ हजार ६२५ किलो मीटर झाली. यामुळे केवळ राष्ट्रीय राज्य मार्गाची लांबीच वाढली नाही, तर कामही मजबूत झाले.

तरतुदीतही ५.५ पटवाढ
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग मजबुतीवर तर जोर दिला आहेच. मात्र, तरतुदीत वाढ केल्यानेच हे शक्य आहे. त्यासाठी या काळात राज्यमार्गांच्या तरतुदीत तब्बल ५.५ पट वाढ झाली आहे. २०१५ च्या आर्थिक वर्षात ही तरतूद ३३ हजार ४१४ कोटी होती, ती २० मार्च २०२१ मध्ये तब्बल १ लाख ८३ हजार १०१ कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणात तरतूद वाढविण्यात आली.

तरतुदीत २०२१ मध्ये १२६ टक्के वाढ
कोरोनाच्या संकटामुळे २०२० मध्ये तरतूद कमी झाली होती. मात्र, त्या तुलनेत २०२१ मध्ये १२६ टक्के तरतूद वाढविली. त्यामुळे रस्ते निर्मितीला वेग आला आहे. पैसा उपलब्ध झाल्याने राज्यमार्गाची लांबी ९ टक्क्यांनी वाढली, असे गडकरी यांनी सांगितले.

आता नवशिक्यांना मिळणार ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या