27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयपर्यटन व्यवसायाला ५ लाख कोटींचा फटका

पर्यटन व्यवसायाला ५ लाख कोटींचा फटका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे पर्यटन व्यवसायाला सुमारे ५ लाख कोटी रुपयांचा फटका बसला असल्याची शक्यता औद्योगिक संस्था सीआयआय आणि हॉटेलिवेट या फर्मने व्यक्त केली आहे. पर्यटन व्यवसाय आणि त्याची पुरवठा साखळी अशा सर्वांवरच कोव्हिड-१९ मुळे परिणाम झाल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे. भारताला पर्यटन व्यवसायातून मोठा पुंजी मिळते. त्यामुळे भारताच्या पर्यटन व्यवसायाला सर्वांत मोठा फटका बसला आहे.

या व्यवसायातील संघटित क्षेत्राचेच २५ अब्ज अमेरिकी डॉलरचे नुकसान झाले आहे. पर्यटन व्यवसायाला उभारी देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे, असेही सीआयआय-हॉटेलिवेट अहवालात नमूद केले आहे. भारताच्या पर्यटन व्यवसायाला बसलेला हा सर्वांत मोठा फटका आहे. पर्यटन क्षेत्रातील क्रूज, कॉर्पोरेट, साहसी, वारसास्थळे अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांना हा फटका बसला आहे. कोरोनामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाउन आणि मंद झालेली अर्थव्यवस्था यामुळे ऑक्टोबर महिन्यापर्यंत या क्षेत्रावर परिणाम होत राहील, असे सुरुवातीला वाटले होते. पण अभ्यासातून पुढे आलेली आकडेवारी वेगळेच दर्शवते.

कारण लॉकडाऊनमुळे तर पर्यटन व्यवसाय बंद राहिलाच. परंतु आता हळूहळू नियम शिथिल होत असतानादेखील कोरोनाचे सावट कायम असल्याने पर्यटन व्यवसाय ठप्प आहे. त्यामुळे मोठा आर्थिक फटका सहन करण्याची वेळ पर्यटन व्यवसायाबरोबरच याच्याशी संबंधित अन्य व्यवसायावरही आली आहे. एवढेच नव्हे, तर आगामी काळातही याची झळ कायम राहील, अशी भीतीही सीआयआय-हॉटेलिवेटने जारी केलेल्या अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.

पर्यटनासह अन्य व्यवसायही मोडित
देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पर्यटन व्यवसायाचा वाटा मोठा आहे. मात्र, कोरोनामुळे हा व्यवसाय पूर्णत: ठप्प आहे. काही ठिकाणी पर्यटन स्थळे सुरू झाली असली, तरी अजूनही कोरोनाचे संकट कायम असल्याने कुणी पर्यटनसाठी बाहेर पडण्यास इच्छुक नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात तर सरकारी आदेशानुसार हा व्यवसाय ठप्प होता. मात्र, आता पर्यटक फिरकत नसल्याने पर्यटन व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे पर्यटनाला अनुसरून अन्य व्यवसायही तेजीत असतात. मात्र, याच्याशी संबंधित हॉटेलिंग, वाहतुकीसह अन्य छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे व्यवसायही मोडित निघाले आहेत.

लॉकडाऊनमुळे मोठी घसरण
या वर्षी सुरुवातीला हॉटेल जवळपास ८० टक्के भरली होती. फेब्रुवारी महिन्यात ७० टक्के, तर मार्च महिन्यात केवळ ४५ टक्केच भरली होती. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात २५ आणि २८ टक्के ही आकडेवारी असेल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यात ३०, तर डिसेंबर महिन्यात ३५ टक्के हा आकडा असेल, असेही अहवालात म्हटले आहे.

कुणाचे किती नुकसान?
ब्रँडेड, नॉनब्रँडेड हॉटेल : १.४२ लाख कोटी
ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर : ३५,०७० कोटी रुपये

पुढील वर्षीही झळ कायम?
ळआताच्या आकडेवारीनुसार पुढील वर्षाच्या सुरुवातीला हॉटेलांमध्ये केवळ ३० टक्के खोल्या या भरलेल्या असतील. हॉटेलांच्या महसुलामध्ये ८० ते ८५ टक्के घट होण्याची शक्यता आहे. देशातील पर्यटन व्यवसाय आणि त्याची पुरवठा साखळी यांना एकत्रित बसलेला फटका हा ५ लाख कोटी रुपयांचा (६५.५७ अब्ज अमेरिकी डॉलर) असू शकतो. यातील २५ अब्ज अमेरिकी डॉलरचा फटका हा संघटित क्षेत्रालाच बसू शकतो.

नशेचा विळखा आणि बॉलिवूड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या