27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीय५० टक्के लसी भारतीयांसाठीच, लोकांना त्या विकत घेण्याची गरज नाही

५० टक्के लसी भारतीयांसाठीच, लोकांना त्या विकत घेण्याची गरज नाही

एकमत ऑनलाईन

लसी तयार झाल्यानंतर सरकारकडूनच खरेदी केल्या जातील. त्यामुळे लोकांना त्या मोफत मिळू शकतात- अदर पूनावाला

मुंबई : दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापर्यंत, वडगाव बुद्रुक पासून वॉशिंगटन पर्यंत सगळे जण एकच प्रश्न विचारात आहेत की कोरोनावर लस कधी येणार. आता याच कोरोनावर लस तयार करण्याचं काम ऑक्सफर्ड विद्यापीठात सुरु आहे. या लशीची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक आहेत. ही लस यशस्वी झाली तर जगाला मोठा दिलासा मिळणार आहे. भारतात या लशीचं उत्पादन पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये केलं जाणार आहे. सीरम इन्स्टिट्युटकडून लस बनवण्याचे काम वेगाने सुरू आहे.

ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिट्युट तयार होणारी लसीसंदर्भातला अहवाल द लॅन्सेट या प्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये प्रसारित झाला. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी अदर पूनावाला यांनी एक महत्त्वाचा दावा केला आहे. सिरमच्या ५० टक्के लसी या भारतीयांसाठी उपलब्ध होणार आहेत. तसंच यासाठी लोकांना कोणतीही किंमत द्यावी लागणार नसल्याचा दावा सिरम इन्स्टीट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी केला आहे.

“या लसीच्या सगळ्या चाचण्या यशस्वी झाल्या आणि सगळे निकाल अगदी व्यवस्थित आले तर सिरम इन्स्टिट्युटही ऑक्सफर्डच्या साथीने या लसींचे उत्पादन करेल. या लसी तयार झाल्यानंतर सरकारकडूनच खरेदी केल्या जातील. त्यामुळे लोकांना त्या मोफत मिळू शकतात” असाही दावा पूनावाला यांनी केला आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे.

सिरम इन्स्टीट्युट ही भारतातली अशी कंपनी आहे जी जगभरातल्या लस उत्पादन कंपन्यांपैकी एक आहे. सध्याच्या घडीला करोनावर लस शोधण्यासाठीचे विविध प्रयत्न सुरु आहेत. अशात ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिट्युट यांच्या साथीने जी लस तयार करण्यात येते आहे त्याचा तिसरा टप्पा बाकी आहे. हा टप्पा भारतात घेतला जावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत जेणेकरुन या लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन भारतात करता येईल असंही अदर पूनावाला यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दुसरीकडे सुरुवातीला कोणतीही लस बल्कमधे (मोठ्या प्रमाणात ) बनवली जाते. त्याप्रमाणे ही लस देखील बल्कमधे बनून तयार आहे. आणखी काही प्रक्रिया झाल्या की ही लस बाटल्यांमधे भरणे सुरु करणार आहोत. या लसीच्या भारतीय लोकांवरही चाचण्या घेण्यात येणार आहेत. या चाचण्यांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होईल. 1500 भारतीय लोकांवर या चाचण्या करण्यात येणार आहेत, असं सीरम इन्स्टिट्युटचे कार्यकारी संचालक राजीव ढेरे यांनी सांगितलं.

ऑक्सफर्ड विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांकडून सुरु असलेले प्रयोग, भारतातील पंधराशे लोकांवर सुरू असलेल्या चाचण्या आणि कायदेशीर सोपस्कार नोव्हेंबर महिन्यात पूर्ण होतील. त्यामुळे डिसेंबर महिन्यात किंवा थोड्या पुढच्या काही दिवसांमध्ये ही लस लोकांना उपलब्ध होऊ शकते. कदाचित ही लस इंग्लंडमध्ये सुरुवातीला थोडीशी आधी उपलब्ध होऊ शकते. पण आपल्याकडे या लशीचे कोट्यावधी डोस आम्ही बनवून तयार ठेवत आहोत. त्यामुळे ती सगळ्यांना लगेच उपलब्ध होईल. मी शास्त्रज्ञ आहे आणि आतापर्यंत ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या प्रयोगाची प्रगती पाहता आपण कोरोना लसीच्या 90 ते 95 टक्के जवळ पोहोचलो आहोत, असा दावा राजीव ढेरे यांनी केला आहे.

Read More  श्रीराममंदीर भूमिपूजन : राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांना तंबी !

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या