तिरुअंतपुरम : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी बेकायदेशीर आणि हिंसक कारवायांसंदर्भात बंदी घालण्यात आलेली इस्लामिक संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि त्याच्याशी संबंधित नेत्यांशी संबंधित असलेल्या केरळमधील ५६ ठिकाणांवर छापे टाकले.
पीएफआयच्या राज्य कार्यकारी समितीचे सात सदस्य आणि पीएफआयचे विभागीय प्रमुख, १२ जिल्ह्यांतील १५ शारीरिक प्रशिक्षक आणि सात कॅडर यांच्या निवासस्थानांवर हे छापे टाकण्यात आले आहेत. हे लोक चाकू, तलवारी आणि इतर शस्त्रे हत्येसाठी वापरण्याचे प्रशिक्षण देत होते, अशी माहिती एनआयएच्या प्रवक्त्याने दिली.
तसेच २० संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती या अधिका-याने दिली. एर्नाकुलममध्ये १३, कन्नूरमध्ये नऊ, मलप्पुरममध्ये सात, वायनाडमध्ये सहा, कोझिकोडमध्ये चार, तिरुवनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा आणि अलाप्पुझा येथे प्रत्येकी तीन, त्रिशूर आणि कोट्टायममध्ये प्रत्येकी दोन आणि पलक्कडमध्ये एका ठिकाणी ही छापेमारी झाल्याचे एनआयएच्या अधिका-यांनी सांगितले.