१० पैकी तीन नैराश्याने त्रस्त
नवी दिल्ली : भारतात सोशल मीडियाच्या वापराबाबत केलेल्या एका अभ्यासात धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यानुसार, सध्या देशातील ७३ टक्के मुले सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यांना अक्षरश: सोशल मीडियाचे जणू व्यसन जडले आहे. या व्यसनाचे गंभीर परिणामही दिसून येत आहेत. त्यानुसार १० पैकी ३ मुले ही नैराश््यग्रस्त असल्याचे समोर आले आहे.
बंगळुरुस्थित राष्ट्रीय मानसिक तपासणी आणि तांत्रिक विज्ञान संस्थेने याबाबत संशोधन केले आहे. या संशोधनानुसार, देशातील ७३ टक्के मुले मोबाईल युजर्स आहेत. यांपैकी ३० टक्के विद्यार्थ्यांना मानसिक विकार जडला आहे. एकूण ७३ टक्क्यांपैकी १० टक्के मुले तर नैराश््यग्रस्त बनले आहेत. त्यांच्यामध्ये भीती, चिंता तसेच चिडचीडेपणाची लक्षण दिसून येत आहेत. काहींचे अभ्यासात लक्ष लागत नाही तर अनेकजण फोन जवळ असल्याशिवाय जेवणही करत नाहीत.
दरम्यान, नवी दिल्लीतील एम्समधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. यतन पाल सिंह म्हणतात, त्यांच्याकडे महिन्याभरात १५ ते १६ मुले समुपदेशनासाठी येतात. यांपैकी ९० टक्के साधारण ते गंभीर स्थितीतील असतात. या मुलांमध्ये मानसिक आजाराच्या तिस-या किंवा चौथ्या टप्प्यातील लक्षण दिसून येतात.
सायबर बुलिंग : निशाण्यावर सर्वाधिक मुली
सायबर बुलिंग म्हणजे काय? तर एकप्रकारे ऑनलाईन छळवणूक होय. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात सायबर बुलिंगला बळी पडलेली प्रकरणे समोर येत आहेत. यांपैकी मोठ्या प्रमाणावर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ऑनलाईन स्टडी आणि इंटरनेट अॅडिक्शन अभ्यासानुसार ५० टक्क्यांहून अधिक सायबर बुलिंगच्या प्रकरणांची नोंदच होत नाही. कारण मुलींना आपला त्रास शेअर करता येत नाही. त्यामुळे त्या हळू-हळू नैराश््यग्रस्त होत जातात.