24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeराष्ट्रीय२०२० मध्ये देशात अत्याचाराचे रोज ७७ गुन्हे!

२०२० मध्ये देशात अत्याचाराचे रोज ७७ गुन्हे!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात २०२० मध्ये दररोज सरासरी ८० खून आणि ७७ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत, ही आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून समोर आली आहे. २०२० मध्येरोज सरासरी ८० हत्यांसह भारतात एकूण २९,१९३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यात हत्येच्या सर्वाधिक घटना उत्तर प्रदेशात घडल्या आहेत. २०१९ च्या तुलनेत २०२० च्या आकडेवारीत १ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१९ मध्ये दिवसाला सरासरी ७९ हत्यांसह एकूण २८,९१५ जणांची हत्या झाली होती.

देशात गतवर्षी अत्याचाराचे रोज ७७ गुन्हे दाखल होत होते. यात राजस्थान आघाडीवर होते, तर दुसरा क्रमांक उत्तर प्रदेशचा होता. तसेच रोज ८० हत्या होत होत्या. यातही उत्तर प्रदेशच आघाडीवर आहे. दरम्यान, २०२० मध्ये रोज सरासरी ७० बलात्काराच्या घटनांची नोंद झाली. वर्षभरात बलात्काराच्या एकूण २८,०४६ घटना घडल्या. गेल्या वर्षी देशभरात महिलांविरोधील ३ लाख ७१ हजार ५०३ गुन्ह्यांची प्रकरणे नोंदवली गेली होती. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये ८.३ टक्क्यांनी घट झाली. २०१९ मध्ये महिलांविरोधातील ४ लाख ५ हजार ३२६ प्रकरणे नोंदवण्यात आली होती.

२०२० मध्ये राजस्थानमध्ये सर्वाधिक ५,३१० बलात्काराच्या घटना नोंदवल्या गेल्या. त्यानंतर उत्तर प्रदेश २,७६९, मध्य प्रदेश २,३३९ आणि चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्रात २,०६१ प्रकरणे नोंदवली गेली. २०१९ मध्ये एक लाख महिला लोकसंख्यमागे गुन्ह्यांचे प्रमाण ६२.३ टक्के होते, तर हेच प्रमाण २०२० मध्ये ५६.५ टक्क्यांवर होते. दरम्यान, २०२० मध्ये देशभरात सर्वाधिक ३ हजार ७७९ हत्येच्या घटनांची नोंद उत्तर प्रदेशात नोंदवली गेली. त्यानंतर ३,१५० बिहारमध्ये आणि तिस-या क्रमांकावर महाराष्ट्र असून राज्यात २,१६३ हत्या झाल्या आहेत, तर मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये १,९४८ खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच राजधानी दिल्लीत २०२० या वर्षभरात ४७२ खून झाले, असेही यात नमूद केले आहे.

२०२० मधील अत्याचार पीडितांमध्ये २५ हजार ४९८ प्रौढ आणि २ हजार ६५५ अल्पवयीन आहेत. धक्कादायक बाब म्हणजे १ लाख ११ हजार ५४९ गुन्हे पती किंवा नातेवाईकांकडूनच घडलेले आहेत. म्हणजेच सर्वाधिक नातेवाईकांनीच छळल्याचे चित्र या अहवालातून दिसून आले.

उत्तर प्रदेशात सर्वाधिक अपहरण
उत्तर प्रदेशात जशा सर्वाधिक हत्या झाल्याची नोंद आहे, तर अत्याचाराच्या बाबतीतही उत्तर प्रदेश दुस-या क्रमांकावर आहे. याशिवाय अपहरणाच्या प्रकरणातही उत्तर प्रदेशच आघाडीवर आहे. अपहरणाच्या प्रकरणात उत्तर प्रदेशात सर्वाधिक १२ हजार ९१३ गुन्हे दाखल आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ९ हजार ३०९ गुन्हे, महाराष्ट्रात ८ हजार १०३ गुन्हे, बिहारमध्ये ७ हजार ८८९, मध्य प्रदेशात ७ हजार ३२० आणि दिल्लीत ४ हजार ६२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

दिल्लीत वाढले महिलांविरुद्ध गुन्हे
२०२० मध्ये देशाच्या राजधानीत महिलांविरोधातील गुन्ह्यांची १० हजार ९३ पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. ही संख्या मुंबई, पुणे, गाझियाबाद, बेंगळुरू किंवा इंदूरमध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या संख्येच्या तुलनेत दुपट्टीपेक्षा जास्त होती, तर २०१८ मध्ये दिल्लीत महिलांविरोधातील गुन्ह्यांची १३ हजार ६४० प्रकरणे नोंदवण्यात आली होती आणि त्या पुढील वर्षी ही संख्या ३०० ने कमी झाली होती.

दिल्लीत चोरी, फसवणूक
वाढली, सायबर गुन्हे कमी
गेल्या वर्षी ऑनलाईन चोरी, फसवणूक आणि लैंगिक छळासह सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीत १६८ पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. दरम्यान, इतर महानगरांच्या तुलनेत दिल्लीत सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या