मेहसाणा : देशात एक शाळा अशीही आहे जी विद्यार्थी किंवा त्यांच्या नातेवाइकांकडून शुल्क घेत नाही. ६ वर्षांपर्यंतच्या शिक्षणासाठी भोजन, निवासापासून सर्व सुविधा मोफत आहेत. शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पात्रतेनुसार सहा लाख रुपयांपर्यंत सन्माननिधीही दिला जातो. ‘श्रीमद् यशोविजयजी जैन संस्कृत पाठशाला’ ही १२५ वर्षे जुनी संस्था गुजरातेतील मेहसाणा येथे आहे.
योगनिष्ठ श्रीबुद्धिसागर सुरीश्वरजी महाराज हे ऑक्टोबर १८९७ मध्ये स्थापन झालेल्या या शाळेचे पहिले विद्यार्थी. शाळेतून आतापर्यंत २८५० विद्यार्थी बाहेर पडले आहेत. यापैकी २२० जणांनी पूर्ण संयमित जीवनाचा स्वीकार केला आहे, तर दीक्षा घेतलेले ३६ विद्यार्थी श्रमण भगवंत आचार्य पदावर आहेत. येथील विद्यार्थी गुजरातसह तामिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात स्थायिक झाले आहेत.