25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeआंतरराष्ट्रीयभारतासाठी जगभरातून मदतीचा हात

भारतासाठी जगभरातून मदतीचा हात

एकमत ऑनलाईन

मॉस्को/ पॅरिस: भारतात कोरोनाच्या दुस-या लाटने हाहाकार उडवला असून गेल्या दोन दिवसांत तर सव्वा तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. एका दिवसांत रुग्णसंख्येमध्ये अमेरिकेपेक्षाही अधिक रुग्ण सापडत आहेत. ऑक्सिजन व औषधांअभावी मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. अशात जगभरातून काही देशांनी भारताला मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. फ्रान्स,रशिया व चीन या देशांनी भारताला वैद्यकीय उपकरणे व औषधांचा पुरवठा करण्यास राजी असल्याचे सांगितले असून इस्त्रायलनेही दिलासा दिला आहे.अमेरिकन खासदारांनीही बायडन प्रशासनाला भारताच्या मदतीसाठी आवाहन केले आहे.

रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची रशियाची ऑफर
भारतात कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. रशियाने रेमडेसिवीर, ऑक्सिजनची मदत करण्याचा प्रस्ताव दिला आहे. आगामी १५ दिवसांमध्ये रशियाकडून आयातही सुरू होणार असल्याची चर्चा आहे. दर आठवड्याला ३ ते ४ लाख रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठ्याची तयारी रशियाने दर्शवली आहे. आवश्यकता भासल्यास त्यात आणखी वाढ करु, तसेच लवकराच समुद्र मार्गे ऑक्सिजनचाही पुरवठा करण्याची तयारी दर्शवली आहे.

फ्रान्सकडून भातृभाव व्यक्त
भारतात सलग दुस-या दिवशी ३ लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळल्यानंतर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यू्अल मॅक्रॉन यांनी मदतीची तयारी दर्शवली आहे. कोविडच्या लाटेचा सामना करणा-या भारतीयांसोबत आम्ही आहोत व हवी ती मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

चीनकडूनही मदतीचे सुतोवाच
चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी भारतातील कोरोना स्थितीवर चीनचे लक्ष असून चीन भारताला शक्य तेवढी मदत करण्यास असल्याचे सांगितले आहे.

इस्रायलकडून भावनिक साथ
इस्रायलनेदेखील भारताबद्दल संवेदना व्यक्त केली आहे. आम्ही कोरोनाविरोधातील लढाईत आमचा चांगला मित्र भारतासोबत आहोत. लवकरच हे संकट दूर होणार असल्याचे इस्रायलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर नमूद करण्यात आले आहे.

अमेरिकेने खासदारांचे सरकारला साकडे
डेमोक्रॅटीक पक्षाचे खासदार एड मार्के यांनीही बायडन प्रशासनाला भारताला मदतीचे साकडे घातले आहे.अमेरिकेजवळ लोकांच्या आवश्यकतेपेक्षाही अधिक लसी आहेत. मात्र, आपण भारतासारख्या देशांना पाठिंबा देण्याचे नाकारत आहोत. मदतीसाठी आपल्याकडे संसाधने असून अन्य लोकांना त्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मदत करणे ही नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा; शरद पवारांचे १९० साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीचे आदेश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या