हैद्राबाद : तेलंगणामध्ये एक जगावेगळी घटना समोर आली आहे. या घटनेने सध्या सगळेच हैराण आहेत. तेलंगणातील एका व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणात एका कोंबड्याला अटक करण्यात आली आहे. ही घटना आहे तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यातील. या ठिकाणी कोंबड्यांच्या झुंजी लढवल्या जात होत्या. या दरम्यानच कोंबड्याने त्याच्या मालकावरच म्हणजेच ४५ वर्षीय सतीश यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका खतरनाक होता की त्यामध्ये सतीश यांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर हे प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये गेले. या प्रकरणी पोलिसांनी या हल्लेखोर कोंबड्याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जगतियाल जिल्ह्यामध्ये अवैध पद्धतीने कॉक फाईट अर्थात कोंबड्यांच्या झुंजी लढवल्या जात होत्या. यादरम्यानच एका कोंबड्याच्या पायाला चाकू बांधला होता. हा कोंबडा पळून जात होता. त्याला पुन्हा झुंजीत उतरवण्यासाठी सतीश प्रयत्न करु लागले. या झुंजीदरम्यानच्या झटापटीत हा चाकू सतीश यांच्या कंबरेखाली लागला. ज्या ठिकाणी हा चाकू लागला त्याठिकाणी त्यांना गंभीर जखम झाली. त्यानंतर त्याठिकाणाहून खूप मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊ लागला. त्यामुळे त्यांना दवाखान्यात नेण्यात आले मात्र त्यांना तिथे मृत घोषित करण्यात आले. देशात १९६० मध्येच कॉक फाईट अर्थात कोंबड्यांच्या झुंजींवर बंदी आहे मात्र तरीही लोकांकडून याचे आयोजन केले जाते.
कोर्टात होणार सादर
या घटनेनंतर पोलिसांनी या कोंबड्याला जप्त करत गोलापल्ला ठाण्यात नेले. तिथे त्याला कस्टडीत ठेवण्यात आले आहे. या कोंबड्याची देखभाल सध्या पोलिस कर्मचारी करत आहेत. पोलिसांच्या सांगण्यानुसार, या कोंबड्याला ताब्यात अथवा अटक केली गेली नाहीये मात्र, सध्या हा कोंबडा पोलिसांकडे आहे. या कोंबड्याच्या खाण्यापिण्याची सोय पोलिसांकडून करण्यात आली आहे. या कोंबड्याला आता कोर्टासमोर सादर केले जाईल आणि पुढील कारवाई पार पडेल.
महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान; ३६ पैकी २८ जिल्ह्यांत संसर्ग पुन्हा वाढला