हाजीपूर : बिहारच्या हाजीपूरमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात राष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते ६ जणांना मारहाण करताना दिसत आहेत. ज्या सहा जणांना मारहाण करण्यात आली, ते मुस्लिम तरुण असून साधूच्या वेशात भिक्षा मागत होते. हाजीपूरमधील कदमघाट इथे हे लोक साधूच्या वेशात नंदी बैलासोबत थांबले असता, त्यांना मारहाण करण्यात आली.
राष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना संशय आल्याने त्यांनी तरुणांकडे चौकशी सुरू केली. चौकशीत साधूच्या वेशात आलेले लोक मुस्लिम असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर बजरंग दलाच्या लोकांनी त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तरुणांना पोलीस ठाण्यात नेले.
पोलीस चौकशीदरम्यान तरुणांनी हा आमचा पिढीजात धंदा असल्याचे सांगितले. आमचे पूर्वजही नंदीबैल घेऊन गावागावात, घरोघर जाऊन भीक मागायचे आणि परंपरेनुसार आम्हीही तेच काम करतो, असे तरुणांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी पीआर बॉन्ड लिहून घेत त्यांना सोडले. तसेच ६ नंदीबैलाला गोशाळेत पाठवण्यात आले.