नवी दिल्ली : आरे येथील कारशेडविरोधातील याचिकेवर शुक्रवार दि. ५ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १० ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली. तोपर्यंत राज्य सरकारला आरेमधील एकही झाड न तोडण्याचे निर्देश दिले.
आजच्या सुनावणीत दोन महत्वाच्या गोष्टींवर सर्वोच्च न्यायालयाने भाष्य केले. एक म्हणजे दहा तारखेला नवे खंडपीठ या प्रकरणावर सुनावणीसाठी नेमले जाणार आहे. तसेच तोपर्यंत एकही झाड तोडू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याचिकाकर्त्यांवर गंभीर आरोप केला.
याचिकाकर्त्यांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाला चुकीची माहिती दिल्याचा आरोप मेहता यांनी केला. याचिकारर्त्यांनी न्यायालयात जे फोटो सादर केले आहेत ते खोटे आहेत. इतर कुठल्यातरी जागेवरचे हे फोटो त्यांनी न्यायालयात सादर केले आहेत असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, सन २०१९ मधील आदेश कायम ठेवत पुढील सुनावणीपर्यंत आरेमधील एकही झाड न तोडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.