नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा देशवासियांच्या मनात भीती निर्माण करणारा आहे. अशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची मानसिक स्थितीवर ही भीती आघात करणारी ठरत आहे. कोरोनाबाधित उर्वरित समाजापासून अंतर बाळगत त्यांच्यासोबत जोडले जावे, या उद्देशाने महत्वाचे निर्देश केंद्र सरकारकडून राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत. देशातील विविध रुग्णालयात उपचारार्थ दाखल झालेल्या कोरोनाबाधितांना स्मार्टफोन, टॅबलेटसचा उपयोग करू द्यावा, असे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहे.
कोरोनाग्रस्तांना त्यांच्या कुटुंबियांशी, मित्रांशी तसेच जवळच्या नातेवाईकांशी संपर्क साधल्याने त्यांना आत्मिकबळ मिळेल तसेच त्यांच्या मानसिक स्थितीवर कोरोनाबद्दलच्या भीतीचा प्रभाव पडणार नाही, या उद्देशाने हे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. नागरिकांच्या मनात त्यामुळे भीती निर्माण झाली आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण मानसिक आजारांना बळी पडू लागले आहे. यासाठी आरोग्य मंत्रालयातील आरोग्य सेवा महासंचालक डॉ. राजीव गर्ग यांनी सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना हे पत्र लिहिले आहे. ‘सामाजिक संबंध रूग्णांना शांत ठेवू शकतात आणि उपचाराने मानसिक मदतही मजबूत करू शकते. कृपया रूग्ण क्षेत्रात स्मार्टफोन आणि टॅबलेट उपकरणांना परवानगी देण्यासंदर्भात सर्व संबंधितांना सूचना देण्यात यावी, जेणेकरून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रुग्ण त्यांच्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी बोलू शकतील, असे निर्देश पत्रातून देण्यात आले आहेत.
दरम्यान, वॉर्डात मोबाइल फोनच्या वापरास परवानगी आहे, जेणेकरून रुग्ण आपल्या कुटुंबाच्या संपर्कात राहू शकतील. परंतु, काही राज्यांतील रूग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णालय प्रशासनाला मोबाइल फोन ठेवण्यास परवानगी देण्यात येत नसल्याने रूग्णाशी संपर्क साधू शकत नसल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. यामुळे हे निर्देश देण्यात आल्याचे समजते.
अमेरिका, ब्राझील यांसारख्या देशानंतर सर्वांधिक कोरोनाबाधितांच्या यादीत भारताचाही समावेश झाला आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेकजण ताणतणावात जगत आहेत. एवढेच नव्हेतर, काहीजणांनी कोरोनाच्या भीतीने आत्महत्यासारखा चुकीचा पर्याय निवडला आहे. अशा रुग्णांना मानसिकदृष्ट्या मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारकडून हे महत्वपूर्ण पत्र पाठवण्यात आले आहे.