गुवाहाटी : आसाममधील पुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी मुकेश अंबानी आणि त्यांच्या मुलाने २५ कोटी रुपयांची मदत केली. त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मुकेश अंबानी आणि अनंत अंबानी यांचे आभार मानले.
आसाममध्ये सतत सुरू असलेला पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती गंभीर झाली असून सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. गेल्या २४ तासात पुरामुळे १० लोकांचा मृत्यू झाला. यानंतर आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे झालेल्या मृतांचा आकडा ११७ वर पोहोचला आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील पुरामुळे बाधित झालेल्या लोकांच्या संख्येत घट झाली आहे. ताज्या अहवालानुसार आसाममधील २८ जिल्ह्यांतील ३३.०४ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.
शुक्रवारी ३० जिल्ह्यांतील ४५.३४ लाख लोक प्रभावित झाले आहेत. दरम्यान, मुकेश अंबानी आणि त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री मदत निधीमध्ये २५ कोटी रुपयांची मदत केली आहे.