नवी दिल्ली : मागील दोन ते तीन दिवसांपासून केंद्राने आणलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातील युवकांकडून विरोध होताना दिसत आहे. देशातील अनेक भागांत यामुळे आंदोलने पेटली आहेत. असे असताना आज लष्कराने यासंबंधित पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये अग्निपथ योजनेची सविस्तर देण्यात आली आहे. या योजनेवर दोन वर्षांपासून चर्चा सुरू असून लष्कराचा फायद्याच्या दृष्टीकोनातून विचार करून ही योजना आणली असल्याची माहिती लष्करातील अतिरिक्त सचिव लेफ्टिनेंट जनरल अनिल पुरी यांनी दिली आहे.
आज अग्निपथ संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, या योजनेचा उद्देश तरुणांमध्ये उत्साह निर्माण करणे हा आहे. अग्निपथ योजना तरुणांसाठी फायदेशीर असून सर्व अग्निवीरांना सामान्य सैनिकांसारखे फायदे मिळणार आहेत. आजच्या तुलनेत अग्निवीरांना अधिक भत्ते आणि सुविधा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. निवृत्तीच्या प्रश्नावर पुरी म्हणाले, तिन्ही सेवांमधून दरवर्षी सुमारे १७, ६०० सैनिक मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतात. निवृत्तीनंतर काय करणार, असे त्यांना कोणी विचारण्याचा प्रयत्न कधीही केलेला नाही. त्यामुळे ही योजना तरुणांच्या भवितव्यासाठी जाणीवपूर्वक टाकलेले पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शहीद अग्निवीरांना १ कोटींची भरपाई मिळणार
सचिव पुरी म्हणाले की, देशसेवेसाठी लढत असताना जर अग्निवीरांना प्राणांती आहुती द्यावी लागली तर त्यांना एक कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. अग्निवीर म्हणून कार्यरत असताना सियाचीनसारख्या भागात असेल तर सध्याच्या सैनिकांना जे भत्ते आणि सुविधा लागू आहेत तेच लागू राहणार आहेत. त्यांच्याशी सेवेच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही.