नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या मोठ्या संकटाने देशाच्या अर्थव्यवस्थेला आजारी पाडले आहे. संपुर्ण देशच लॉकडाऊन करावा लागल्यामुळे अनेक उद्योग बंद, रोजगार नष्ट व अर्थव्यवस्थाही गोत्यात आली. त्यापार्श्वभुमीवर पुन्हा अशा संकटाचा सामना करावा लागल्यास देशाची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा मनोदय अर्थमंत्र्यांच्या सादरीकरणातून दिसून आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर स्वस्थ भारत या नव्या योजनेची घोषणा केली आहे. योजनेंतर्गत पुढील ६ वर्षांमध्ये ६४,१८० कोटी रुपयांची तरतूद करणार असून गावापासून शहरापर्यंत आरोग्य सुविधा सुधारण्याचा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय आरोग्य योजनेच्या व्यतिरिक्त ही तरतूद असणार असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.
नव्या आजारांच्या शक्यतेवरही लक्ष
प्रतिबंधात्मक, गुणकारी, कल्याणकारी आरोग्य सेवेवर भर दिला जाणार आहे. तसेच नव्या आजारांवरही लक्ष ठेवले जाणार आहे. याद्वारे ७५ हजार ग्रामीण आरोग्य केंद्र, सर्व जिल्ह्यामध्ये चाचणी केंद्र, ६०२ जिल्ह्यांमध्ये क्रिटिकल केअर हॉस्पिटल, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र तसेच इंटिग्रेटेड आरोग्य माहिती पोर्टल अधिक सक्षम केले जाणार आहे. याशिवाय विशेष आरोग्य सेवा केंद्रे व संशोधन संस्थांचीही निर्मिती करण्यावर भर दिला आहे.
अशा असतील विशेष तरतुदी
– शहरांपासून ग्रामीण पातळीपर्यंत आरोग्य सेवा सुधारणार
– १७ नवीन सार्वजनिक आरोग्य केंद्र उघडणार
– ३२ विमानतळांवरही आरोग्य सेवा
– नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड हेल्थची निर्मिती
– ९ बायोलॅब तर ४ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजींची स्थापना
आरोग्य क्षेत्रासाठी आणखी काय?
– यंदाच्या आरोग्य बजेटचे आकारमान तब्बल २ लाख ३२ हजार कोटी
– गतवर्षीपेक्षा १३६ टक्के वाढ
– कोरोना लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद
– पोषण अभियानाची घोषणा; ११२ जिल्ह्यात पोषण आहार देणार
वीजपंपांची थकबाकी भरल्यास सवलत; अजित पवार यांचे आश्वासन