27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयबिहारमध्ये जाळपोळ, तोडफोड रेल्वे पोलिस ठाण्यावर हल्ला, वाहनेही जाळली, पोलिसांचा गोळीबार

बिहारमध्ये जाळपोळ, तोडफोड रेल्वे पोलिस ठाण्यावर हल्ला, वाहनेही जाळली, पोलिसांचा गोळीबार

एकमत ऑनलाईन

पाटणा : अग्निपथ योजनेची घोषणा झाल्यापासून या योजनेला देशभरातून विरोध होत आहे. अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी तरुण रस्त्यावर उतरले आहेत. बिहारमध्ये सलग चौथ्या दिवशी जाळपोळ, तोडफोड सुरू राहिली. राजधानी पाटणामधील मसौधी येथील टारगेना स्टेशनजवळ आज दगडफेक आणि गोळीबार झाला. आंदोलकांनी रेल्वे स्थानकाची तोडफोड केली.

तसेच पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने पेटवून देण्यात आली असून, पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. दरम्यान, इतर राज्यांतही आंदोलनाची धग कायम आहे. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रकच कोलमडले आहे.

बिहारमधील मसौढी येथे आज सकाळी ८ वाजता कोचिंगमधून बाहेर पडल्यानंतर विद्यार्थी स्टेशनवर जमा झाले आणि स्थानकाची तोडफोड सुरू केली. स्टेशन मास्तरांची केबिन आणि बुकिंग काउंटर पेटवून देण्यात आले. वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. यानंतर आंदोलकांकडून पोलिसांवर १०-१५ राउंड गोळीबार करण्यात आला. पोलिसांनीही १०० हून अधिक गोळ््या झाडल्या.

बक्सरच्या नवानगरमध्ये एमएच १२० वर आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यावेळी हल्लेखोरांनी पोलिसांवर हल्ला केला. पोलिस निरीक्षकांची गाडी पेटवून देण्यात आली. बचावासाठी पोलिसांनी दोन-चार राउंड फायर केले.

राज्यात वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर १५ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच खासगी शाळांनाही आज सुटी देण्यात आली आहे. जेहानाबादच्या तेहता मार्केटमध्ये आज सकाळी आंदोलकांनी दगडफेकीनंतर ट्रक पेटवला. तीन दिवसांपासून राजधानी पाटणासह २५ जिल्ह्यांमध्ये आंदोलन पेटले आहे. आतापर्यंत १० रेल्वेगाड्या पेटवल्या आहेत.

रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
बिहारमध्ये आंदोलनाची तीव्रता अधिक असल्याने राज्यात अनेक ठिकाणी रेल्वे रात्री ८ ते पहाटे ४ पर्यंत धावणार आहेत. २ दिवस दिवसाचे नियोजन थांबविण्यात आले. भागलपूरमध्ये अर्धा डझन रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. खगडिया स्थानकावरून जाणा-या ३ गाड्या वगळता सर्व गाड्या धावण्यास मनाई आहे. राज्यातील सर्वच रेल्वे स्थानकावर बंदोबस्त वाढविण्यात आला असून, अनेक ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आले. याशिवाय महाराष्ट्रातील नांदेडसह अनेक राज्यांत काही रेल्वे रद्द कराव्या लागल्या.

संरक्षण मंत्रालयाच्या भरतीत अग्निवीरांना १० टक्के आरक्षण
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने अग्निवीरांना मंत्रालयांतर्गत भरतीत १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. राजनाथसिंग यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत. अग्निवीरांना भारतीय तटरक्षक आणि संरक्षण नागरी पदांसह संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या १६ कंपन्यांमध्ये नियुक्तीत आरक्षण दिले जाईल, असे संरक्षण मंत्रालयाचे म्हणणे आहे.

स्वस्त दरात मिळणार कर्ज
संरक्षण मंत्री कार्यालयाने केलेल्या ट्विटमध्ये ४ वर्षे सैन्यात सेवा केल्यानंतर बाहेर पडणा-या तरुणांना आयुष्यभर अग्निवीर म्हणून ओळखले जाईल. तसेच सेवा संपल्यानंतर त्यांना अनेक शासकीय विभागांत निवडीसाठी प्राधान्य देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच इतर कोणतेही काम करायचे असेल तर त्यांना स्वस्त दरात कर्जाची सुविधाही दिली जाईल, असे घोषित करण्यात आले.

सरकारचे पाऊल दिशाहीन
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तरुणांना हिंसा न करण्याचे आवाहन केले असून अग्निपथ योजना हे सरकारचे दिशाहीन पाऊल असल्याचे म्हटले आहे. सोनिया गांधी सध्या रुग्णालयात आहेत. तेथून त्यांनी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांच्याद्वारे तरुणांपर्यंत आणि सरकारपर्यंत हा संदेश पोहोचवला आहे.

अन्यथा नोकरीस मुकावे लागेल
अग्निपथ योजनेच्या भरतीवर तरुणांकडून अशा हिंसक प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती. आंदोलन करणा-या तरुणांना पुढे याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. कारण पोलिसांच्या पडताळणीत गुन्हे दाखल असल्याचे आढळल्यास नोकरी मिळणार नाही, असा इशारा एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी दिला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या