23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयअयोध्या झाली 'राम'मय

अयोध्या झाली ‘राम’मय

एकमत ऑनलाईन

अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. 5 ऑगस्टचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे, यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. अयोध्या सुशोभित केली आहे त्यामुळे अयोध्येत दिवाळीसारखे वातावरण तयार झाले आहे.

भूमिपूजनासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी 5100 कलश तयार करण्यात आले आहेत. भूमिपूजनामध्ये काही कलशांचा उपयोग केला जाईल आणि काही कलश रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येतील जेथून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काफिला जाईल. अयोध्येत आज आणि उद्या त्यांच्यात दिवे पेटविण्यात येतील.

जेव्हा पंतप्रधान मोदी अयोध्येत पोहोचतील तेव्हा सरयू दर्शन, पूजन, आचमन करतील. मग ते हनुमानगढीस येतील आणि येथील हनुमानजींच्या दरबारात दर्शन पूजन परिक्रमा करतील. येथे पंतप्रधान मोदींना आशीर्वाद आणि सन्मान म्हणून एक फेटा बांधला जाईल तसेच गदा सोपविण्यात येईल. पंतप्रधान मोदींचे स्वागत करणाऱ्यांमध्ये बाबरी मशिदीचे समर्थक असलेले इक्बाल अन्सारीही असतील. यावेळी ते पंतप्रधान मोदींना रामचरितमानस, राम नामाची पगडी देतील.

आतापासूनच अयोध्येत भजन कीर्तन सुरू झाले आहे. संतांनी सर्वत्र तळ ठोकला आहे आणि लोकांना रामचरित मानस पाठ करण्यास सांगितले गेले आहे. अधिक लोकांनी भूमिपूजनाच्या ठिकाणी येऊ नये, घरात दिवे लावावेत आणि राम नामाचा जाप करावा, असे आवाहन ट्रस्टने केले आहे. कोरोना संकटामुळे सामाजिक अंतराचे पालन केले जात आहे.

अयोध्या भूमिपूजेमध्ये सहभागी अतिथींना मिळणार ‘ही’ खास भेट
भूमिपूजनानिमित्त सर्व २०० अतिमहत्वाच्या व्यक्तींना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. हा सोहळा संस्मरणीय बनवण्यासाठी मान्यवरांना एक खास चांदीचे नाणे भेट देण्यात येणार आहे. या नाण्याच्या एका बाजूला राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान असणार आहेत. तर दुसऱ्या बाजूस तीर्थ क्षेत्रचा प्रतीक चिन्ह आहे.

बुधवारी प्रथमत: रामलल्लाला हिरवे कपडे परिधान केले जातील. त्यानंतर भगवे कपडे घालतील. या विशेष कपड्यांसाठी नऊ रत्ने सोन्याच्या धाग्याने लावण्यात आली आहेत. रविवारी शिंप्याकडून हे वेश देण्यात आले आहेत, असे आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते 12 वाजून 15 मिनिट आणि 15 सेकंदांनी 32 सेकंद वेळात पहिली वीट रचली जाईल. ही वीट 35 ते 40 किलो वजनाची असून ती चांदीची बनवली आहे.

व्हाइट हाऊसमध्येही साजरा होणार अयोध्येतील भूमिपूजन सोहळा
उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीच्या भूमिपूजनाचा सोहळा होणार आहे. फक्त भारतातच नव्हे तर अमेरिकेतही हा ऐतिहासिक क्षण साजरा केला जाणार आहे. अमेरिकेतील मंदिरांमध्ये उद्या अयोध्येतील भूमिपूजनाच्या निमित्ताने खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यूएस कॅपिटोल हिल येथे मंगळवारी खास जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी बनवलेल्या ट्रकवर राम मंदिराचे डिजिटल फोटो दाखवले जाणार आहेत. अमेरिकेतील मंदिरांमध्ये भूमिपूजनाच्या निमित्ताने उद्या विशेष पूजा आणि प्रार्थनांचे आयोजन करण्यात आले आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाचा क्षण साजरा करण्यासाठी दिवे प्रज्वलित करणार असल्याचे तिथे स्थायिक असलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांनी सांगितले.

कॅपिटोल हिल आणि व्हाइट हाऊसबाहेर आज रात्री फिरत्या ट्रकमधून एलईडी डिस्प्लेद्वारे भव्य श्री राम मंदिराचे फोटो प्रदर्शित केले जातील, असे वॉशिंग्टन डीसीमधील भारतीय-अमेरिकन नागरिकांनी सांगितले. राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा न्यूयॉर्कमध्येही साजरा केला जाणार आहे. तिथे वेगवेगळे होर्डिंग्स भाडयावर घेतले असून त्यावर प्रभू रामचंद्र आणि अयोध्येतील भव्य राम मंदिराचे फोटो दाखवले जाणार आहेत.

Read More  भूमिपूजनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाला संबोधन

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या