लखनौ : बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी येत्या ३० सप्टेंबर रोजी लखनौचे विशेष सीबीआय कोर्ट निकाल देणार आहे. निकालाच्या दिवशी न्यायाधीश एस. के. यादव यांनी लालकृष्ण अडवाणींसह सर्व आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
बाबरी मशीद पाडल्या प्रकरणात निकाल देण्यासाठी मागच्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने लखनौच्या विशेष सीबीआय कोर्टाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली होती. या प्रकरणात एकूण ३२ आरोपी आहेत. यात माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, भाजपा नेते मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी ऋतुंभरा हे आरोपी आहेत.
६ डिसेंबर १९९२ रोजी कार सेवकांनी अयोध्येत मशिद पाडली होती. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे भाजपाचे वरिष्ठ नेते राम जन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व करत होते. बचाव आणि अभियोग पक्षाचा युक्तिवाद १ सप्टेंबर रोजी संपला. त्यानंतर या खटल्याची सुनावणी करणाºया विशेष न्यायाधीशांनी निकाल लिहायला सुरुवात केली. या प्रकरणात सीबीआयने न्यायालयासमोर ३५१ साक्षीदार आणि पुरावा म्हणून ६०० कागदपत्रे सादर केली, अशी माहिती सीबीआयचे वकिल ललित सिंह यांनी दिली.
अडवाणी-जोशींशिवाय विश्व हिंदू परिषदेचे नेते आणि मशिद पाडणाºया कार सेवकांविरोधातही एफआयआर नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात एकदा अडवाणी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोर्टासमोर हजर झाले व या प्रकरणात आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले. राजकीय कारस्थानांतर्गत अडवाणी यांना या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले आहे. त्यांच्याविरोधातील सर्व पुरावे चुकीचे आहेत, असे अडवाणी यांचे वकील के. के. मिश्रा यांनी म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाने वाढवून दिली होती मुदत
या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने याआधी सीबीआय न्यायालयाला ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत दिली होती. पण त्यानंतर विशेष सीबीआय कोर्टाला ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून दिली. त्यामुळे आता या खटल्याची सुनावणी ३० सप्टेंबर रोजी ठेवण्यात आली असून, या दिवशी बाबरी मशिद पाडल्या प्रकरणाचा निकाल देण्यात येणार आहे.
मराठा आरक्षणासाठी पक्षभेद बाजूला ठेऊन एकजुटीने लढणार ! -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे