नवी दिल्ली : कोरोनाच्या लसीचे काही गंभीर दुष्परिणाम होण्याचा अंदाज केंद्र सरकारकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पहिल्या लसीच्या दुष्परिणामांना तोंड देण्यासाठी राज्य सरकारांनी जिल्हा स्तरावर तयारी करावी अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. मागील आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना याबाबत पत्र पाठविले होते. पत्रामध्ये लसीसंदर्भातील सुमारे एक डझन अत्यावश्यक सेवा उभारण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच लसीच्या दुष्परिणामांना तोंड देण्यासाठी मेडिकल सर्व्हिलन्स यंत्रणा उभारण्यास सांगितले आहे.
लवकरच लसीकरण सुरु होणार
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. मनोहर अगनानी यांनी सदर पत्र लिहिले आहे. पत्रामध्ये, तुम्हाला या गोष्टीबद्दल माहिती असेल की सर्व राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये कोरोनासंदर्भातील लसीकरण करण्याची तयारी सुरु आहे, असे म्हटले आहे. कोरोना लसीच्या दुष्परिणामांबद्दलची नोंदणी आणि त्यासंदर्भातील सर्व तंत्रज्ञान अधिक सक्षम करण्याचेही आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.
३०० वैद्यकीय महाविद्यालयांचा योजनेत समावेश
देशभरातील ३०० वैद्यकीय महाविद्यालये आणि अन्य तृतीय दर्जाच्या रुग्णालयांना कोरोनाच्या लसीचे दुष्परिणाम झालेल्यांवर उपचार करण्यासंदर्भातील योजनेमध्ये सहभागी करुन घेत आहोत असेही केंद्राने राज्यांना कळवले आहे. राज्यातील न्यूरोलॉजिस्ट, कार्डियोलॉजिस्ट, श्वसन चिकित्सा विशेषतज्ज्ञ, प्रसूति तसेच स्त्री रोग विशेषज्ज्ञ आणि बालरोग विशेषज्ज्ञांची टीम तयार ठेवण्याचेही केंद्राने दिलेल्या निर्देशात म्हटले आहे.
आरोग्य क्षेत्रातील कर्मचा-यांना प्रथम लस ?
कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर प्राधान्यक्रम कसा असेल? यावरुन विविध अंदाज वर्तवले जात आहेत. मात्र सरकारमधील काही मंत्र्यांनी आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक असा प्राधान्यक्रम असेल, असे संकेत दिले आहेत. पहिली जी लस उपलब्ध होईल, त्याचा डोस या एक कोटी कर्मचा-यांना दिला जाईल असे सांगण्यात येत आहे.
सरकार जाईल त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ