नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. ३ जानेवारीपासून भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू झाली. भारत जोडो यात्रा सप्टेंबर महिन्यात कन्याकुमारीपासून सुरु झाली. तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, नवी दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये भारत जोडो यात्रेने प्रवास केला. आता ही यात्रा पंजाबमधून प्रवास करत असून, ही यात्रा आता काश्मिरात दाखल होणार आहे. या यात्रेचा समारोप ३० जानेवारीला काश्मीरच्या श्रीनगरमध्ये होणार आहे.
काँग्रेस प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हाथ से हाथ जोडो अभियान सुरू करणार आहे. या अभियानाचे नेतृत्त्व प्रियंका गांधी करणार असल्याची माहिती आहे. हाथ से हाथ जोडो अभियानात काँग्रेस देशभर तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवरील कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. बिहार काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेशप्रसाद सिंह यांनी बांका जिल्ह्यातील ऐतिहासिक मंदिरापासून बोधगयापर्यंतच्या १२५० किमी राज्यव्यापी यात्रेची सुरुवात केली आहे. दुसरीकडे पश्चिम बंगालचे पक्षाचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनीदेखील ८०० किमी पदयात्रेची सुरुवात केली आहे. ही यात्रा गंगासागरच्या दक्षिणेकडून सुरुवात झाली असून ही यात्रा दार्जिलिंगपर्यंत जाणार आहे.
भारत जोडो यात्रा बिहार, पश्चिम बंगाल या मोठ्या राज्यांमधून गेलेली नाही. त्यामुळे बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये राज्यव्यापी यात्रांचे आयोजन काँग्रेसकडून केले जाणार आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशात काँग्रेसला १९९० नंतर स्वबळावर सत्ता मिळालेली नाही. दुसरीकडे त्रिपुरामध्ये १९९३ पासून काँग्रेस सत्तेबाहेर आहे. ओडिशामध्येही काँग्रेस बरीच वर्ष सत्तेत नाही. पश्चिम बंगालमध्ये गेल्या ५० वर्षांपासून काँग्रेस सत्तेबाहेर आहे. झारखंडमध्येही २००० नंतर काँग्रेसला स्वबळावर सत्ता मिळालेली नाही.