23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeराष्ट्रीयभूपेंद्र पटेल यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

भूपेंद्र पटेल यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

एकमत ऑनलाईन

गांधीनगर : भाजप नेते भूपेंद्र पटेल यांनी आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर रविवारीच पक्षाने भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र, मंत्रिमंडळात दुसरा कोणताही बदल झालेला नाही. पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होण्यापूर्वी भाजपने पाटीदार समाजाच्या नेत्याकडे राज्याची धुरा सोपविल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

आज गांधीनगर येथील राजभवन येथे एका कार्यक्रमात भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नेतृत्वाने भूपेंद्र पटेल यांची गुजरातचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड केली होती. पटेल हे पाटीदार समाजातून आले आहेत, त्यामुळे भाजपाने निवडणुकीपूर्वी राज्यातील या प्रमुख समाजाला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला आहे.

भूपेंद्र पटेल राज्यातील सर्व मोठ्या पाटीदार नेत्यांपेक्षा कमी लोकप्रिय असले तरी यांची निवड करण्यामागील एक कारण म्हणजे राज्यातील भाजपच्या बड्या पटेल नेत्यांमध्ये वर्चस्वाची गटबाजी असल्याचेही मानले जाते. याशिवाय ते माजी मुख्यमंत्री आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे आहेत.

नगरसेवक ते मुख्यमंत्री
भूपेंद्र पटेल ज्यांच्या नेतृत्वाखाली २०२२ च्या विधानसभा निवडणुका लढल्या जातील, त्यांनी २०१० मध्ये अहमदाबाद महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून पहिली मोठी निवडणूक लढवली होती. ते नगरसेवक म्हणून पहिल्या कार्यकाळात महापालिकेमध्ये स्थायी समिती अध्यक्ष झाले. माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघ घाटलोडियामधून भूपेंद्र पटेल प्रथमच आमदार झाले. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या