बिकानेर : राजस्थानमध्ये बनावट नोटांविरोधात मोठी कारवाई करण्यात आलीय. बिकानेर पोलिसांनी शनिवारी रात्री जयनारायण व्यास कॉलनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून बनावट नोटांच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केलाय. पोलिसांनी सुमारे दीड कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे.
बिकानेर रेंजच्या आयजींनी स्वत: ही छापेमारी कारवाई केली आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. याप्रकरणी किती आरोपींना अटक करण्यात आली आणि किती रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या, याबाबत पोलिसांनी अद्याप खुलासा केलेला नाही. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री बिकानेर शहरातील पॉश कॉलनी पोलिस स्टेशन परिसरात बनावट नोटांविरोधात ही कारवाई करण्यात आली.
बिकानेर रेंजचे आयजी ओम प्रकाश यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात बनावट नोटा आणि छापण्याचं मशीन जप्त केले आहे. पोलिसांना घटनास्थळी सुमारे दीड कोटी रुपयांची बनावट रोकड सापडली आहे. पोलिसांनी बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात आलेले ब्लॉक मशीन आणि प्रिंटरही जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी टोळीशी संबंधित अनेक आरोपींना अटक केली.
सर्वांत मोठी कारवाई
बनावट नोटांवर राज्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा आयजी ओम प्रकाश यांनी केला. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांनी संपूर्ण कारवाई उघड केली नव्हती. रात्री उशिरापर्यंत पोलिस बनावट नोटा मोजण्यात आणि आरोपींवर कारवाई करण्यात व्यस्त होते. बहुधा रविवारी पोलिसांच्या पत्रकार परिषदेत संपूर्ण प्रकरण उघड होईल.