23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयउद्योग जगताची मोठी हानी

उद्योग जगताची मोठी हानी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन झाले. पालघर येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये त्यांनी आपला जीव गमावला. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारासा सूर्या नदीवरील पुलावर दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. उद्योग जगताचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी दिली आहे तर राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सर्वसामान्यापासून उद्योग आणि राजकीय स्तरातून प्रतिक्रिया आल्या आहेत. सायरस मिस्त्री यांचे अकाली निधन धक्कादायक आहे. भारताच्या आर्थिक पराक्रमावर विश्वास ठेवणारे ते एक आश्वासक व्यापारी नेते होते. त्यांच्या जाण्याने वाणिज्य आणि उद्योग जगताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व हरविले : मुख्यमंत्री शिंदे
टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला. सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

चौकशीचे आदेश : उपमुख्यमंत्री फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत चौकशीचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारे, एक उमदे असे ते व्यक्तिमत्व होते. विनम्रता हा त्यांचा स्थायीभाव होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

मोठा धक्का : शरद पवार
सायरस मिस्त्री यांच्या निधनाची बातमी हा मोठा धक्का असल्याच्या भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत. देशाच्या विकासात सायरस मिस्त्री यांचे मोठे योगदान आहे असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

माझा भावाचा मृत्यू : सुप्रिया सुळे
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष व माझे बंधुतुल्य सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यु झाला. मिस्त्री कुटुंबाशी आम्हा सर्वांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. या दु:खद घटनेमुळे मी आजचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलत आहे,याची कृपया नोंद घ्यावी. नवा कार्यक्रम लवकरच कळविला जाईल. तसदीबद्दल क्षमस्व.

ऐकून दु:ख झाले : नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही ट्वीट करत दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचं महाराष्ट्रातील पालघर येथे झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची बातमी ऐकून खूप दु:ख झाले. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या