रायपूर : कोरोना महामारीचा संसर्ग वाढू लागताच देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला. संचारबंदीमुळे लोकांना घरातच अडकून पडावे लागले. अशावेळी बहुसंख्य लोकांनी स्वत:ला फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर आदी सोशल मिडीयामध्ये गुंतवून ठेवण्यातच आनंद मानला. मात्र दिवसातील बहुतांश काळ ऑनलाईन राहिल्याने लोकांच्या तब्येतीवर विपरीत परिणाम होत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
मोबाईलमधून निघणा-या रेडिएशनमुळे डोळे, डोके यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला आहे. अनेक नेटक-यांचे जैविक घड्याळच बिघडले असल्याचा दावा रायपुरमधील पंडित रविशंकर शुक्ल विद्यापीठातील शास्त्र विभागाने केला आहे. विद्यापीठाने लॉकडाऊनपुर्वी व नंतर सोशलमिडीयावर सक्रिय असलेल्या लोकांच्या एका गटाचे सर्वेक्षण केले. फेसबुकच्या मेसेंजर अॅपवरील पाच गटातील २६३७ सदस्यांच्या वर्तनावर १६ दिवसांसाठी लक्ष ठेवले. लॉकडाऊननंतर सोशल मिडीयावर सक्रिय होण्याच्या प्रमाणात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. जास्त काळ ऑनलाईन राहिल्यामुळे डोळे, पोट, डोके यांच्या कार्यावर परिणाम झाला.
दिनचर्याच पूर्णपणे बदलली
अनेकांची दिनचर्याच पुर्णपणे बदलून गेली. वेळेवर न उठणे, वेळेवर न झोपणे, वेळेवर न जेवणे अशा गोष्टी घडत आहेत. अधिक काळ मोबाईल किंवा कॉंम्युटरसमोर राहिल्याने रेडिएशनमुळे डोळ्यांची जळजळ, तणाव वाढला. डोळे कोरडे पडणे, लाल होणे अशा गोष्टी आढळल्या. परिणामी पुरेशी झोप न लागणे, चिडचिडेपणा वाढणे अशा समस्या वाढल्या. पोटाचे विकार, डोकेदुखीत वाढ झाली.
जैविक घड्याळ म्हणजे काय ?
सामान्य काळात आपण ज्या वातावरणात राहतो, जशा क्रिया करतो त्यानुसार आपल्या शरीरातील सर्व अवयव स्वत:ला जुळवून घेतात. जुळवून घेण्याच्या या प्रक्रियेतून नैसर्गिकपणेच शरीरातील प्रत्येक अवयव आपल्याला न कळत सर्व कामे करीत असतात, त्याला जैविक घड्याळ म्हणतात. एकप्रकारे ती शरीराची स्वयंशिस्त असते, ज्यामुळे शरीर सुरळित चालते. मात्र लॉकडाऊन काळात अधिक काळ सक्रियतेमुळे हे घड्याळच बिघडत असल्याचे संशोधनात म्हटले आहे.
नांदेड जिल्ह्यात ३९३ कोरोनाचे नवे रुग्ण