नवी दिल्ली : येत्या ११ जूनला क्षमा बिंदू ही गुजरातच्या बडोदा येथील २४ वर्षीय तरुणी स्वत:शीच लग्न करणार आहे. बडोदा येथे होणा-या या अनोख्या लग्नाची देशभर चर्चा सुरू आहे. मात्र या लग्नाला आता भाजपने विरोध केला आहे.
सोलोगॅमी म्हणजेच स्वत:शीच लग्न करणे ही पद्धत हिंदू धर्माच्या विरोधात आहे. त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होईल असा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपने या लग्नाला विरोध दर्शविला आहे.
गुजरातमधील भाजप नेत्या सुनीता शुक्ला यांनी या लग्नाच्या विरोधात आवाज उठवला आहे. त्या म्हणाल्या की, मी लग्नासाठी जे स्थळ निवडण्यात आले आहे त्याच्या विरोधात आहे. तरुणीची मानसिक स्थिती ठीक नाही. त्या तरुणीला सोलोगॅमी पद्धतीने कोणत्याही मंदिरात लग्न करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे ११ जूनला नटूनथटून थाटामाटात मंदिरात लग्न करण्याच्या विचारात असणा-या क्षमाला लग्न करताना अडथळा येणार, की लग्न कोणत्याही विरोधाशिवाय पार पडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
क्षमाच्या म्हणण्यानुसार अन्य मुलींप्रमाणे माझंही नवरी बनण्याचं स्वप्न आहे. परंतु मला पारंपरिक पद्धतीने लग्न करायचं नाही. त्यामुळे मी नवरदेवाविना लग्न करण्याचा विचार केला आहे. स्वत:प्रति असलेले प्रेम व्यक्त करण्याचा आणि आत्मस्वीकृतीचा मार्ग मी निवडला आहे. क्षमा बिंदूच्या निमित्ताने असे लग्न आपल्याकडे पहिल्यांदाच होत असले तरी पाश्चात्त्य देशांत हा ट्रेंड आधीच सुरू झाला आहे. १९९३ मध्ये अमेरिकेत लिंडा बार्केनने स्वत:शी लग्न केले होते.