बंगळुरू : कर्नाटकातील काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि इतरांविरुद्ध १८ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.
१७ आणि १८ जुलै रोजी कर्नाटकातील सत्ताधारी भाजपने आपल्या आमदारांना लाच दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे मतदार आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी एनडीएच्या उमेदवार (मुर्मू), मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील, ज्येष्ठ भाजप नेते बीएस येदियुरप्पा, सतीश रेड्डी आणि भाजपच्या नेत्यांनी आमदारांना लाच दिली. शिवाय, आमदारांना येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये बोलावून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करताना प्रशिक्षण सत्राच्या नावाखाली आमदारांना आलिशान खोल्या, भोजन, मद्य, पेये, मनोरंजनाची सोय करण्यात आली होती, असा आरोपीही त्यांनी केला आहे.
१८ जुलै रोजी सकाळी जवळपास सर्व मंत्री, आमदार आणि इतर वरिष्ठ भाजप नेते हॉटेलमधून विधानसभेला बंगळुरू महानगर परिवहन महामंडळाच्या बसमधून आले. भाजप नेत्यांची ही सर्व कृत्ये मतदारांना किंवा आमदारांना लाच देणे आणि निवडणूक जिंकण्याची शक्यता वाढवण्यासाठी होती असेही आरोपात म्हटले आहे. काँग्रेस नेत्यांनी निवडणूक आयोगाला एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू, बोम्मई, येडियुरप्पा, कटील आणि रेड्डी यांनी केलेल्या निवडणूक गुन्ह्यांची दखल घेण्याचे आवाहन केले आहे.
फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, १९५२ तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे.