जयपूर : राजस्थानमध्ये बहुजन समाज पक्षाने (बीएसपी) राज्यात १० जून रोजी होणा-या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकलेल्या सर्व सहा आमदारांना व्हीप जारी केला आहे. बसपाचे प्रदेशाध्यक्ष भगवान सिंह बाबा यांनी सांगितले की, पक्षाने आमदार राजेंद्र सिंह गुढा, लखन सिंह, दीप चंद, जोगिंदर सिंह अवाना, संदीप कुमार आणि वाजिब अली यांना व्हीप जारी करण्यात आला. राज्यसभेत काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला मतदान न करण्याचे आदेश या आमदारांना देण्यात आले आहेत.
प्रदेशाध्यक्ष भगवान सिंह बाबा म्हणाले या आमदारांनी पक्षाच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक जिंकली होती, त्यामुळे आज बसपाने जारी केलेल्या व्हिपनुसार, त्यांना पक्षाचा नियम पाळणे बंधनकारक आहे. सध्या सुरू असलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने ठरवले आहे की, या निवडणुकीत बसपा भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या धोरणांशी सहमत नसून त्यांनी उभे केलेल्या उमेदवारांना आमचा विरोध आहे. अशा स्थितीत बसपाचे आमदार अपक्ष उमेदवारालाच मतदान करतील.