नवी दिल्ली : सुरक्षा रक्षकांसाठी बुलेट प्रूफ जॅकेट्स, सेफ्टी कपडे आदी तयार करणा-या ऑर्डनन्स इक्विपमेंट फॅक्टरीच्या, ट्रूप कम्फर्ट्स लिमिटेडने वजनाने हलके आणि कमी किंमतीत मिळणारे बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केले आहे.
हे नवीन जॅकेट फॅशनेबल आहे. या जॅकेटमुळे व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी लोकांच्या संरक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परिधान करत असलेल्या जॅकेटसारखीच या जॅकेटची रचना असून त्याचे वजन ३ किलो आहे.
कंपनीने हे जॅकेट ‘पोलीस एक्स्पो’मध्ये प्रदर्शनासाठी ठेवले होते. कंपनीच्या अधिका-यांचे म्हणणे आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता पाहता या जॅकेटला ‘मोदी जॅकेट’ असे नाव देण्यात आले आहे. या जॅकेटचे वैशिष्ट्य म्हणजे हे कमी वजनाचे असून पॉइंट ९ एमएम पिस्तुलमधून १० मीटर अंतरावरून झाडलेली गोळी या जॅकेटमध्ये आत जाऊ शकत नाही.
दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय पोलीस एक्स्पोच्या पहिल्या दिवशी फायर आर्म्स, ड्रोन, बुलेट प्रूफ जॅकेट, सायबर सिक्युरिटी, मोबाईल फॉरेन्सिक, काउंटर ड्रोन, सशस्त्र वाहने यांसारखी उपकरणे प्रदर्शित करण्यात आली होती. १८ देशांतील ३५० हून अधिक कंपन्या या एक्स्पोमध्ये सहभागी झाल्या आहेत.
एक्स्पोचे आयोजक मुकेश खारिया म्हणाले की, हा कार्यक्रम पोलीस, कायदा सुव्यवस्था अधिकारी, सुरक्षा एजन्सींना जागतिक दर्जाच्या आणि देशांतर्गत उत्पादकांशी जोडण्याची संधी देईल. भारत, यूके, अमेरिका, इस्रायल, जर्मनी, फ्रान्स, दुबई, यूएई, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, रशिया, स्पेन, इटली, डेन्मार्क आणि स्वीडन या देशांतील कंपन्या या एक्स्पोमध्ये सहभागी झाल्या आहेत.