चंदिगढ : विजयादशमीनिमित्त देशभरामध्ये रावणाचे पुतळ्यांचे दहन करण्यात आले असताना मात्र पंजाबमध्ये एका ठिकाणी रावणाच्या पुतळ्यावर पंतप्रधान मोदींचा मुखवटा लावून पुतळ्याचे दहन करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
भाजपाने आता या प्रकरणामध्ये काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हा सर्व प्रकार काँग्रेसचा डाव असल्याचे म्हटले आहे. पंजाबमध्ये सध्या जे काही होत आहे ते राहुल गांधीच्या इशा-यावर केले जात आहे. घडलेली घटना ही लज्जास्पद असली तरी अनेपेक्षित नव्हती, असा टोलाही नड्डा यांनी लगावला आहे.
पंजाबमधील या घटनेची माहिती समोर आल्यानंतर भाजपविरुद्ध काँग्रेस असे आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले आहे. नड्डा यांनी पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या पुतळ्याचे दहन करण्याचा लज्जास्पद प्रकार हा राहुल गांधीच्या निर्देशानुसार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. मात्र त्यांच्याकडून अशाच गोष्टीची आपल्याला अपेक्षा असल्याचा टोलाही नड्डा यांनी लगावला. नेहरु आणि गांधी कुटुंबाने देशाच्या पंतप्रधान पदाचा कधीच मान ठेवला नाही. २००४ ते २०१४ च्या कालावधीमध्ये असेच चित्र पाहायाला मिळाले. या कालावधीमध्ये पंतप्रधान पद अधिक अधिक दुबळे करण्यात आले, असेही नड्डा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
पंजाबमधील प्रकार निंदनीय : राहुल गांधी
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटवरुन पंजाबमध्ये जे काही झाले ते निंदनीय असल्याचे मत व्यक्त केले आहे. पंतप्रधानांबद्दलचा पंजाबमधील शेतक-यांचा रोष वाढताना दिसत आहे. घडलेली घटना म्हणजे याच असंतोषाचे उदहारण असून हे देशासाठी चांगले नाही. पंतप्रधानांनी या शेतक-यांना भेटले पाहिजे. त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना मदत केली पाहिजे, असे राहुल यांनी म्हटले आहे.
सातबारा उतारा काढण्याची शासनाची वेबसाईट बंद सर्वर डाऊन