नवी दिल्ली : लैंगिक शोषणाच्या आरोपांनी कोंडी झालेले भारतीय कुस्ती महासंघाचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या अडचणींत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्ली पोलिसांना या प्रकरणी ४ साक्षीदार सापडले आहेत. त्यांनी बृजभूषण यांच्यावरील आरोपांची पुष्टी केली आहे. यात १ ऑलिम्पियन, कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट, इंटरनॅशनल रेफ्री आणि राज्यस्तरीय प्रशिक्षकाचा समावेश आहे. या प्रकरणातील १२५ साक्षीदारांत यांचा समावेश आहे.
दिल्ली पोलिस आरोप झालेल्या ठिकाणी म्हणजे हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड आणि कर्नाटक या ४ राज्यांमध्ये याचा तपास करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपांना पुष्टी देणारे साक्षीदार ऑलिम्पियन आणि कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेत्या महिला कुस्तीपटू आहेत. त्यांनी दिल्ली पोलिसांच्या तपास पथकाला सांगितले की, बृजभूषण यांच्याकडून लैंगिक शोषण झाल्यानंतर महिन्याभराने गुन्हा दाखल करणा-या महिला कुस्तीपटूने आपल्याला ही गोष्ट सांगितली होती.
तक्रारकर्त्यांपैकी एका महिला कुस्तीपटूच्या प्रशिक्षकाने दिल्ली पोलिसांच्या एसआयटीला सांगितले की, बृजभूषण यांनी लैंगिक अनुकूलतेची इच्छा प्रकट केल्यानंतर ६ तासांनी पीडितने ही गोष्ट फोनवरून मला सांगितली. आंतरराष्ट्रीय रेफ्रींनी सांगितले की, ते टूर्नामेंटसाठी भारतात किंवा परदेशात जायचे तेव्हा महिला कुस्तीपटूंकडून आपण ही समस्या ऐकली.