पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली जातीनिहाय जनगणनेसाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्यास मंजुरी देण्यात आली. जातीनिहाय जनगणनेसाठी ४ वाजता बैठकीला सुरुवात झाली होती. या बैठकीनंतर नितीशकुमार यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जातीनिहाय जनगणनेच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. सर्वपक्षीय बैठकीत सर्वांच्या पाठिंब्याने जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्वपक्षीय बैठकीत जनगणना करण्यास मंजुरी देण्यात आल्यानंतर यासंबंधी प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठीकत मांडला जाईल, अशी माहिती नितीशकुमार यांनी दिली आहे. जातीनिहाय जनगणना करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
विधिमंडळाची दोन वेळा मंजुरी
बिहारच्या विधिमंडळाने जातीनिहाय जनगणनेच्या प्रस्तावाला यापूर्वी दोन वेळा मंजुरी दिली आहे. मात्र, जातीनिहाय जनगणना करण्यात आलेली नाही. मागील वर्षी बिहारचे विरोधीपक्ष नेते तेजस्वी यादव यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.