नवी दिल्ली : देशात अनेक दिवसांपासून प्रतीक्षित असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण शनिवारपासून सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. याआधी केंद्र सरकारने राज्यांना लसीकरणासंबंधी नियमावली पाठवली आहे. नियमावलीत लसीकरणादरम्यान कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या नाही याचा स्पष्ट उल्लेख केला आहे.
कोरोनायोद्ध्यांना सर्वात आधी लसीचा लाभ मिळणार असून, त्यापैकी काही जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे संवादही साधणार आहेत. लसीकरण मोहिमेच्या प्रारंभावेळी लसींचा पुरवठा आणि वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी तयार केलेल्या को-विन ऍपचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आरोग्य क्षेत्रातील जवळपास तीन कोटी कर्मचा-यांना २९३४ केंद्रांवर लस टोचण्यात येणार आहे. एका केंद्रावर दररोज एका सत्रात १०० जणांचे लसीकरण करण्याची सूचना राज्यांना देण्यात आली आहे. लसीकरणादरम्यान काही मात्रा वाया जाण्याची शक्यता गृहीत धरून प्रति १०० कुप्यांमागे दहा कुप्या राखीव ठेवण्याची सूचना आहे. लसीकरणासाठी वयोमर्यादा आखण्यात आलेली असून १८ पेक्षा जास्त वय असलेल्यांनाच यामध्ये सहभागी करुन घेता येणार आहे. गरोदर माता किंवा ज्यांना गरोदरपणाबद्दल नक्की माहिती नाही तसेच स्तनपान करणा-या मातांचे लसीकरण करु नये असे केंद्राकडून सांगण्यात आलं आहे.
लसीची अदलाबदल नको
केंद्र सरकारने यावेळी लसीची अदलाबदल केली जाऊ नये असे स्पष्ट सांगितले आहे. पहिला डोस ज्या लसीचा देण्यात आला होता त्याच लसीचा डोस दुस-यावेळी दिला जावा असे केंद्राने नमूद केले आहे. औषध नियामकाने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या वापराला परवानगी दिली असून २८ दिवसांच्या अंतराने दोन डोस घ्यावे लागणार आहेत.
बाधित रुग्णांच्या लसीकरणावेळी प्रोटोकॉल पाळा
ज्यांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्यासाठी प्रोटोकॉल पाळावा लागणार आहे. कोरोनाची लक्षणे असणा-यांचे, प्लाझ्मा थेरपी झालेल्यांचे तसेच इतर कारणांमुळे रुग्णालयात दाखल असणा-यांचे लसीकरण ४ ते ८ आठवड्यांसाठी स्थगित करावे लागणार आहे.
पोलिओ लसीकरणाची वेळ बदलली
देशात शनिवारपासून सुरू होणारी ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असेल. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रपतींच्या कार्यालयाशी सल्लामसलत करून पोलिओ लसीकरणाच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून, पोलिओ लसीकरण ३१ जानेवारीला असेल, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
मी कोणत्याही हनी ट्रॅपचा भाग नाही; कृष्णा हेगडेंच्या आरोपांनंतर रेणू शर्माने मौन सोडले