24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeराष्ट्रीयअ‍ॅपबंदीनंतर चीन चिंतेत

अ‍ॅपबंदीनंतर चीन चिंतेत

- परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांची प्रतिक्रीया

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: केंद्र सरकारने भारतात ५९ चिनी ऍप्स बॅन केल्यानंतर आता चीनकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियन यांनी, त्यांचा देश भारताने उचललेल्या पावलानंतर चिंतेत असल्याचे म्हटले असून परिस्थितीची पडताळणी सुरू असल्याचे सांगितले आहे. वृत्तसंस्था एएनआयने ट्विटरद्वारे याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, चिनी ऍप्स बॅन करण्याच्या भारताच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना, चीन याबाबत चिंतेत असून, परिस्थितीची पडताळणी सुरू आहे, अशी प्रतिक्रिया झाओ लिजियन यांनी दिली.

दरम्यान, वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे ५९ ऍप्स वर बंदी घालून भारताने चीनला दणका दिला आहे. यामध्ये टिकटॉक, कॅमस्कॅनर, शेअरइट अशा अनेक लोकप्रिय ऍप्स चाही समावेश आहे.

‘तो’ आरोप चुकीचा- टिकटॉक इंडिया

भारत सरकारने एकंदर ५९ ऍप्स ब्लॉक करण्यासंदर्भात अंतरिम आदेश जारी केला असून यात टिकटॉकचाही समावेश आहे. आम्ही या आदेशाचे पालन करत आहोत. आम्हाला याबाबत सरकारच्या संबंधित विभागाच्या अधिका-यांशी बैठकीचे निमंत्रण आले असून या बैठकीत आम्हाला आमची बाजू मांडण्याची व स्पष्टीकरण देण्याची संधी मिळणार आहे.

डेटा प्रायव्हसी व डेटा सिक्युरिटीबाबतच्या सर्व भारतीय अधिनियमांचे टिकटॉक काटेकोरपणे पालन करत असून आमच्या भारतातील वापरकर्त्यांची कोणतीही माहिती आम्ही कोणत्याही परदेशी सरकारला दिलेली नाही, चिनी सरकारलाही नाही. भविष्यात आमच्याकडे अशी मागणी करण्यात आली, तरीही आम्ही अशी माहिती कोणत्याही परिस्थितीत देणार नाही. आमच्या दृष्टीने वापरकर्त्यांची गोपनीयता व अखंडता याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असं टिकटॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी म्हटलं आहे.

सुरक्षेच्या दृष्टीनेच अ‍ॅपवर बंदी

देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक असलेले घटक या माहितीचा गैरवापर करीत असून त्याद्वारे देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहोचत असून, ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असून, त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने बंदीचे आदेश जारी करताना म्हटले आहे. हे हानीकारक अ­ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती.

तसेच नागरिकांतूनही या ऍप्सबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटले आहे. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींचा आधार घेत ही कारवाई केली. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ‘६९अ’ मधील तरतुदींचा आधार घेत ५९ ऍपवर बंदी आणण्यात आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. अँड्रॉइड आणि आयओएस प्रणालींवर प्रचलित असलेल्या या ऍपकडून भारतीय वापरकर्त्यांची माहिती बेकायदा साठवून भारताबाहेरील सर्वरना पुरवली जात असल्याच्या तक्रारी विविध माध्यमांतून करण्यात आल्या होत्या.

Read More  घुसखोरीला उत्तर देण्याची आता तुमची वेळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या