बीजिंग : वृत्तसंस्था
लडाख सीमेवरील भारत-चीन तणावानंतर दोन्ही सैन्यांतील कमांडरस्तरीय चर्चेनंतरही दोन्ही देशांतील तणाव कायम आहे. ग्लोबल टाईम्स या चीनच्या सरकारी न्यूज पोर्टलवरही या तणावाचे तरंग आता उमटू लागले आहेत. ग्लोबल टाईम्सने एका लेखाच्या माध्यमातून भारतावर पुन्हा एकदा मानसिक हल्ला चढवलेला आहे.
सीमेवरील परिस्थितीच्या नावाखाली भारतातील काही राष्ट्रवादी शक्ती भारतीयांमध्ये चीनविरोधी भावना बळावण्याला प्रोत्साहन देत आहेत. चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन भारतीय ग्राहकांना उद्देशून करत आहेत; पण भारतीय ग्राहकांना चिनी उत्पादनांची इतकी सवय झालेली आहे की, भारतीय राष्ट्रवाद्यांच्या प्रयत्नांना काही यश येईल, अशी चिन्हे दिसत नाहीत, असे चिनी न्यूज पोर्टल ग्लोबल टाईम्सच्या या लेखात म्हटलेले आहे. पूर्व लडाखमधील तणाव शांततापूर्ण पद्धतीने दूर करण्यावर चीनचा भर हा वरकरणी असल्याचे या लेखातून दिसून येते.
बहिस्कार चळवळ अपयशी होईल: चीन
लेखात म्हटले आहे की, चीनविरुद्ध भारतीयांना भडकावण्याचा आणि कोरोनावरून चीनला बदनाम करण्याचा उद्योग भारतामध्ये काही कडव्या राष्ट्रवादी शक्ती करत आहेत; पण त्यांचे हे अभियान यशस्वी होणार नाही. कारण, चिनी उत्पादने ही भारतीयांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेली आहेत. लडाख तणावानंतर गेल्या काही दिवसांत भारतामध्ये चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मोहीम तीव्र बनली आहे.
Read More अनैतिक संबंधातून पतीची हत्या : पत्नी, प्रियकरानेही स्वतःला संपवलं
लेखात सोनम वांगचुक यांचा उल्लेख
या चिनी लेखात भारतीय संशोधक सोनम वांगचुक (थ्री इडियट चित्रपटातील वास्तविक नायक) यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. लेखात म्हटले आहे की, सोनम वांगचुकसारखे लोक सर्वसामान्य भारतीयांना उद्देशून चिनी मालावर बहिष्कार घालण्यासाठी उकसवत आहेत. चीनला धडा शिकविण्यासाठी वांगचुक यांनी यूट्यूबवर एक व्हीडीओ पोस्ट केला होता.
भारतीय सैन्यापेक्षा चिनी वस्तू आवश्यक आहेत का?
आपण मोठ्या प्रमाणात चीनच्या सामानावर बहिष्कार टाकू लागलो आहोत तसेच, चीनची अॅप काढून टाकत आहोत एका सर्वेक्षणातून ९१ टक्के जनता चीनच्या सामानावर बहिष्कार टाकू इच्छित असल्याचेही समोर आले आहे. याचा परिणाम चीनवर होत असून तो गुगल आणि ट्विटरवर दबाव टाकत आहे. याचा अर्थ आपण जे काही करत आहोत ते परिणामकारक ठरत आहे, असेही ते म्हणाले. ते जर भारतीय चीनच्या सामानाशिवाय राहूच शकत नाही अशी टीका करत असतील तर त्यामागेही काही कारण आहे. आपण चीनच्या सामानाशिवाय शिवाय राहू शकतो का नाही, याचा विचार आता आपल्या जनतेने करायचा आहे. आपल्यामुळे सीमेवरच्या जवानांना कितीही त्रास झाला तरी आम्हाला चीनच्या वस्तू हव्या, अॅप हवी याचं उत्तर आता चीनला नागरिकांनीच द्यावे, भारतीय सैन्यापेक्षा चिनी वस्तू आवश्यक आहेत का, असा सवालही वांगचूक यांनी सर्व भारतीयांना केला आहे़
चीनची निर्यात ३़३ टक्क्यांनी घटली
कोरोना आणि व्यापाराच्या आघाडीवर अमेरिकेसह भारतासोबतच्या तणावामुळे चीनच्या आयात-निर्यातीत घसरण झाली आहे. चीनच्या सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यात देशाची निर्यात ३़३ टक्क्यांनी घटली असून, या महिन्यात २०६़८ अब्ज डॉलरची निर्यात झाली आहे. आयातही गतवर्षातील मे महिन्याच्या तुलनेत १६़७ टक्क्यांनी घटली असून, १४३़९ अब्ज डॉलरची आयात या महिन्यात झाली आहे.