सीवान : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. या निकालानंतर सीवानमध्ये भाजपा आणि राजदच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे समजते. तसेच, घटनेतील पीडितांकडून पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सीवान जिल्ह्याच्या गोरेयाकोठी विधानसभा मतदारसंघातील अंगया गावात ही घटना घडली. या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार देवेशकांत सिंह यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपा आणि राजदच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत राजदचे काही समर्थक जखमी झाले आहेत. जखमींना सीवानच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
अंगया गावातील काही दलित आणि कुशवाहा कुटुंबीयांनी आपल्या घरांवर राजदचा झेंडा लावला होता. यावरून गावातील भाजपा समर्थक नाराज होते. त्यानंतर निवडणुकीचा निकाल हाती येताच भाजपाच्या समर्थकांचा जोर वाढला आणि बाचाबाचीला सुरुवात झाली. या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत राजदचे समर्थक गंभीर स्वरुपात जखमी झाले. त्यांच्यावर सीवानच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी समर्थकांच्या म्हणण्यानुसार, घरावर राजदचा झेंडा लावण्यावरून गावात भाजपा समर्थक नित्यानंदसिंह यांच्यासहित १४ जणांनी मारहाण केली. दरम्यान, या घटनेची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.
कोरोनातही शिक्षण विभागाने केली उत्तम कामगिरी