25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयअमरनाथ गुहेजवळ ढगफुटी; 15 जणांचा मृत्यू

अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी; 15 जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जम्मू : अमरनाथ येथे शुक्रवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास गुहेजवळ ढगफुटी झाली. त्यावेळी गुहेजवळ १० ते १५ हजार भाविक उपस्थित होते. या भीषण दुर्घटनेत ३ महिलांसह १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अजूनही ४५ जण बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये अनेक जण जखमी झाले असून, या घटनेनंतर लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आले. येथे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

काश्मीरच्या आयजीपींनी दिलेल्या माहितीनुसार अमरनाथ गुहेपासून एक ते दोन कि.मी. अंतरावर ढगफुटी झाली. डोंगरावरून आलेल्या जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे भाविकांसाठी उभारलेले सुमारे २५ तंबू आणि दोन लंगर वाहून गेले. या पाण्यामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला असून, अनेकांचे सामान वाहून गेले. तसेच येथे थांबलेले अनेकजण बेपत्ता झाले आहेत. आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर लगेचच लष्कर, आयटीबीपी, सीआरपीएफ, एनडीआरएफ आणि एसडीआरएफने बचावकार्य वेगात सुरू केले. अनेकांना एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर अनेकांना सुरक्षितरित्या बाहेर काढून छावण्यांमध्ये नेण्यात येत आहे. अपघातानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी चर्चा करून यात्रेकरूंना आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना केल्या.

अमरनाथमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. यंदा ३० जूनपासून ही यात्रा सुरू झाली आहे. ४३ दिवस चालणा-या या यात्रेची ११ ऑगस्ट रोजी सांगता होणार आहे. या यात्रेत आतापर्यंत ६५ हजारांहून अधिक भाविकांनी अमरनाथ गुहेतील बाबा बर्फानीचे दर्शन घेतले आहे. परंतु खराब हवामानामुळे २ ते ३ दिवस प्रवास थांबवावा लागला होता.

मदत व बचावकार्य वेगात
ढगफुटीचे वृत्त समजताच एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि इतर यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून, बचावकार्य वेगात सुरू आहे, अशी माहिती पहलगाम संयुक्त पोलिस नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. तसेच जखमींना उपचारासाठी विमानाने रुग्णालयात हलविण्यात आले असून, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे, असेही सांगण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या