नवी दिल्ली : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांमध्ये आरोग्य विम्याबाबत जागरूकता वाढली आहे; मात्र कोरोनाकाळातील विम्यामुळे कंपन्यांचे दिवाळे निघाले आहे़ जनरल इन्शुरन्स कौन्सिल आणि इन्शुरन्स कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते ऑगस्ट २०२० या कालावधीत २२,९०३ कोटी रुपयांच्या आरोग्य विमा पॉलिसींची विक्री करण्यात आली आहे. गेल्या सात वर्षांमध्ये २०,२५० कोटी रुपयांच्या आरोग्य विमा पॉलिसींची विक्री झाली.
देशात कोरोना आल्यानंतर उपचारांसाठी ३३०० कोटी रुपयांचे २.०७ लाख दावे विमा कंपन्यांकडे दाखल झाले आहेत. आतापर्यंत इन्शुरन्स कंपन्यांनी १.३० लाख दाव्यांच्या बदल्यात १२६० कोटी रुपये मंजूर केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत आरोग्य विमा क्षेत्रात २३ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. सध्या देशभरात ३२ जनरल आणि हेल्थ इन्शुरन्स कंपन्या आरोग्य विम्याची विक्री करतात.
बाजारातील विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील ३५ टक्के व्यक्तींजवळ कोणत्या ना कोणत्या स्वरूपात (ऑफिस अथवा वैयक्तिक) आरोग्य विमा आहे. आतापर्यंत आरोग्य विम्यावर खर्च करण्याला प्राथमिकता दिली जात नव्हती किंवा दुर्लक्ष करण्यात येत होते. मात्र, कोरोनाच्या संक्रमणानंतर आरोग्य विम्याबाबतची जागरूकता वाढली आहे. त्यामुळे आरोग्य विम्याची विक्री वाढल्याचेही दिसून आले आहे.
देशभरातून २़०७ लाख ग्राहकांनी केले दावे
एकतीस ऑगस्टपर्यंत देशभरातून २.०७ लाख ग्राहकांनी कोरोनावरील उपचारांसाठी दावे केले आहेत. ऑगस्टच्या अखेरपर्यंत देशात कोरोनाची एकूण ३६.८७ लाख प्रकरणे नोंदविण्यात आली होती. याचाच अर्थ कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी केवळ ५.६१ टक्के रुग्णांनीच दावे दाखल केले आहे. दाव्यांची सरासरी रक्कम १.५९ लाख रुपये आहे.
तरुण ग्राहकांना अधिक रस
मॅक्स बुपा हेल्थ इन्शुरन्सतर्फे आरोग्य विम्याची स्थिती जाणून घेण्यासाठी नुकताच सर्वे करण्यात आला. ३५ वर्षांपर्यंतच्या तरुणांचा आरोग्य विम्याकडे वाढता ओढा असल्याचे दिसून आले आहे. सर्वेनुसार कोरोनापूर्वी ४२ टक्के जण इन्शुरन्स घेण्यासाठी इच्छुक होते.
ऑनलाइन इन्शुरन्समध्ये वाढ
इन्शुरन्स कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाउन काळात नव्या पॉलिसीची खरेदी आणि पॉलिसीचे नूतनीकरण करण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मची मदत मोठ्या प्रमाणावर घेण्यात आली. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही ऑनलाइनवरच वाढता भर असल्याचे दिसून आले.
रॉ चीफ भेटीनंतर नेपाळ पंतप्रधान ओली वादाच्या भोव-यात