पाटणा : चारा घोटाळा प्रकरणातील दोषी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्यापुढे नवे संकट निर्माण झाले आहे. चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असतानाही मोबाईलद्वारे बिहारच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत लालूंविरोधात भाजप आमदार ललन पासवान यांनी पोलिसांत एफआयआर दाखल केली आहे.
झारखंड उच्च न्यायालयातही याचिका
पासवान यांनी पाटणाच्या निगरानी पोलीस ठाण्यामध्ये लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. झारखंड उच्च न्यायालयात याचसंदर्भात आज एक जनहित याचिकाही दाखल केली आहे. शिक्षा भोगत असतानाही लालू प्रसाद यादव मोबाईलचा वापर करत आहेत. तसेच बिहारच्या आमदारांना सत्तेचे लालूच दाखवत नितीश कुमार सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न ते तुरुंगातूनच करत आहेत, असे या याचिकेत म्हटले आहे.
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, रांचीच्या ‘रिम्स’च्या संचालकांच्या रिकाम्या पडलेल्या बंगल्यात लालूप्रसाद यादव यांना हलवले होते. लालूंवर झालेल्या आरोपांनंतर गुरुवारी रिम्स प्रशासनाने पुन्हा एकदा लालूंची रवानगी रिम्सच्या पेर्इंग वॉर्डमध्ये करण्याची तयारी केली आहे.
जामिन याचिकेवर होणार परिणाम
चारा घोटाळा प्रकरणातील दोषी लालू प्रसाद यादव यांच्या जामीन याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. मात्र या तुरुंगातून फोन प्रकरणाचा थेट परिणाम लालूंच्या जामीन याचिकेवर होऊ शकतो.
दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे नाहीच