नवी दिल्ली : राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याप्रकरणी काँग्रेसकडून कुलदीप बिश्नोई यांच्यावर कडक कारवाई करीत त्यांना पक्षाच्या सर्व पदांवरून हटवण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिली आहे. बिश्नोई यांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारसही काँग्रेस हरियाणा विधानसभेच्या अध्यक्षांकडे करू शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे.
निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अजय माकन यांचा पराभव झाल्यानंतर बिश्नोई यांनी ट्वीट केले होते की, फन कुचलने का हुनर आता है मुझे, सांप के खौफ से जंगल नहीं छोड़ा करते, असे ट्वीट बिश्नोई यांनी केले होते. योग्य वेळी घेतलेला निर्णय एखाद्या व्यक्तीला इतरांपासून वेगळे करतो असेही ते म्हणाले होते.
माकन का हरले?
रिटर्निंग ऑफिसर आरके नंदल यांनी सांगितले की, भाजप नेते पंवार यांना ३६ मते मिळाली, तर कार्तिकेय शर्मा यांना २३ प्रथम पसंतीची मते मिळाली आणि ६.६ मते भाजपकडून हस्तांतरित झाली. त्यांची एकूण मतांची संख्या २९.६ झाली. या लढतीत माकन यांना २९ मते मिळाली. मात्र, दुस-या पसंतीचे मत न मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.